राजकीय भूमिका विद्यापीठाच्या बाहेर घ्या ; शिक्षणमंत्र्यांचा विद्यार्थ्यांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 06:31 PM2019-07-29T18:31:14+5:302019-07-29T20:44:38+5:30
वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी राजकीय भूमिका घेऊ नये असा नियम असणारी नियमावली नुकताच पुणे विद्यापीठाने तयार केली आहे. त्यावर शिक्षणमंश्री विनाेद तावडे यांनी स्पष्टीकरण दिले.
पुणे : विद्यार्थ्यांनी राजकीय भूमिका विद्यापीठाच्या कॅपसबाहेर घेण्यास हरकत नाही परंतु विद्यापीठात राजकीय भूमिका नकाे. असा सल्ला शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनी विद्यार्थ्यांना दिला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवी नियमावली तयार केली असून त्यात विद्यार्थ्यांनी कुठलिही राजकीय भूमिका घेऊ नये तसेच सरकार शासनविरोधी कृत्य करू नये असे म्हंटले आहे. तसेच राष्ट्र-विरोधी,समाज व जातीय विरोधी व राजकीय पक्षांचे उपक्रम राबवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या नियमांच्या विराेधात विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आज तावडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या नियमांबद्दल विचारले असता विद्यार्थ्यांनी राजकीय भूमिका ही विद्यापीठाच्या बाहेर घ्यावी. मात्र विद्यार्थ्यांच्या प्रश्नांविषयी काय म्हणायचे असेल तर त्याची संधी त्यांना असणार आहे. विद्यापीठात कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार हाेता कामा नये. विद्यार्थ्यांना राजकीय भूमिकेशिवाय विद्यार्थ्यांचे नेतृत्व विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर करता आले पाहिजे. आमच्यावेळी आम्ही जी आंदाेलने केली ती विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केली. आणि राजकीय आंदाेलने अलका टाॅकीज चाैकात केली. दाेन्हींची गल्लत आम्ही केली नाही. असे ते म्हणाले.
याबाबत बाेलताना एनएसयुआयची रुक्साना पाटील म्हणाली, विद्यापीठाने तयार केलेल्या नियमावलीमध्ये स्पष्टता नाही. नवीन नियम हे बालीश आहेत. विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, मेस हीच चर्चा करण्याची ठिकाणं असतात. तिथेच जर बाेलण्यावर बंदी घालण्यात येणार असेल तर विद्यार्थ्यांनी आपले म्हणणे मांडायचे कुठे ? हे नियम म्हणजे विद्यार्थ्यांच्या लाेकशाहीवरचा हल्ला आहे. आम्हाला आमच्या अडचणी घेऊन व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवता येत नसेल किंवा आपल्या हक्काची जपणूक करता येत नसेल तर कसले आम्ही संविधानाला अपेक्षित नागरिक बनू ? नियमांमध्ये देशविराेधी कृती करु नये असे म्हणण्यात आले आहे. सरकारविराेधी किंवा व्यवस्थेविरुद्ध बाेलणे हे जर देशविराेधी असेल तर हे लाेकशाही धाेक्यात आल्याचे लक्षण आहे.
वसतिगृहात राहायचे असेल तर राजकीय भूमिका नकाे ; पुणे विद्यापीठाचा अजब कारभार