युवकांचे प्रश्न जाहीरनाम्यात घ्या ; तरुणाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 07:47 PM2019-03-04T19:47:02+5:302019-03-04T19:49:11+5:30
तरुणांचे प्रश्न राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यात घ्यावेत अशी मागणी तरुणाईने केली असून त्यासाठी विविध 12 मुद्देही विविध राजकीय पक्षांना पाठविण्यात आले आहेत.
पुणे : तरुणांचे प्रश्न राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यात घ्यावेत अशी मागणी तरुणाईने केली असून त्यासाठी विविध 12 मुद्देही विविध राजकीय पक्षांना पाठविण्यात आले आहेत. त्याचबराेबर तरुण राजकीय नेत्यांशी तरुणाई संवाद साधणार असून युवकांच्या संकल्पनेतील युवा जाहीरनामा असा कार्यक्रम 14 मार्चला पुण्यात हाेणार आहे.
भारत हा तरुण देश असल्याचे म्हंटले जाते. भारतात तरुणांची संख्या जगात सर्वाधिक आहे. ही संख्या येत्या काळात आणखी वाढणार आहे. आज तरुणांसमाेर शिक्षणापासून ते नाेकरीपर्यंत अनेक प्रश्न आहेत. निवडणुका आल्या की राजकीय पक्ष आपले जाहीरनामे तयार करतात. त्यात अनेकदा तरुणांच्या प्रश्नांचा समावेश फार कमी असताे. तरुणांचा देश असताना राजकारणी तरुणांच्या प्रश्नाबाबत तितकेसे गंभीर नसल्याचे सध्या चित्र आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यात तरुणांच्या प्रश्नांचा सहभाग करावा अशी मागणी पुण्यातील स्टुटंड हेल्पिंग हॅण्ड या संस्थेकडून करण्यात आली आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या विविध 12 मुद्दांशी तरुण सहमत असल्याची स्वाक्षरी माेहीम देखील घेण्यात आली हाेती. पुण्यातील विविध महाविद्यालयांमध्ये ही माेहीम घेण्यात आली. 14 मार्च राेजी हाेणाऱ्या कार्यक्रमात युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, युवक राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उपाध्यक्ष रविकांत वरपे, भाजपाचे आमदार निरंजन डावखरे, शिवसनेचे खासदार श्रीकांत शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, धनगर समाजाचे नेते गाेपीचंद पडळकर सहभागी हाेणार आहेत.
तरुणांच्या 12 मुद्द्यांवर बाेलताना स्टुडंट हेल्पिंग हॅण्डची संध्या साेनवणे म्हणाली, राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात अनेकदा युवकांच्या प्रश्नांचा विचार केला जात नाही. तसेच ताे तयार करताना तरुणांना सहभागी करुन घेतले जात नाही. त्यामुळे त्यांचा अंतर्भाव या जाहीरनाम्यांमध्ये असणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांशी संबंधित 12 मुद्दे काढले असून त्याचा अंतर्भाव राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात करण्यात यावा अशी आमची मागणी आहे.