स्मृती इराणींचा राजीनामा घ्या ; राष्ट्रवादीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 03:47 PM2018-10-24T15:47:10+5:302018-10-24T15:52:49+5:30
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीकडून निषेध करण्यात अाला. तसेच स्मती इराणी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात अाली.
पुणे : रक्ताने माखलेले सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मित्राच्या घरात जाऊ शकता का मग त्याच अवस्थेत तुम्ही मंदिरात कशा जाऊ शकाल असा प्रश्न केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एका कार्यक्रमात केला हाेता. त्यावर अाता राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रीया येत असून राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून अाज पुण्यात अांदाेलन करुन स्मती इराणींच्या राजीनाम्याची मागणी करण्यात अाली.
एका कार्यक्रमात बाेलताना स्मृती इराणी यांनी शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वरील वक्तव्य केले हाेते. राष्ट्रवादी काॅंग्रसच्या वतीने अाज पुण्यातील तांबडी जाेगेश्वरी मंदिराबाहेर अांदाेलन करुन इराणी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात अाला. इराणींच्या वक्तव्यामुळे भाजपाची मनुवादी तसेच स्त्रीयांना कमी लेखण्याची मानसिकता दिसून येत असल्याची टीकाही यावेळी करण्यात अाली.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचेपुणे शहरअध्यक्ष चेतन तुपे म्हणाले, स्मृती इराणी यांनी केलेले वक्तव्य म्हणजे स्त्रीत्वाचा आणि मात्रत्वाचा अपमान आहे. निसर्गाने स्त्रियांना दिलेल्या देणगीचा असा अपमान करणे त्यांना शोभत नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्त्रिवर्गात असंतुष्टता निर्माण झाली आहे. स्मृती इराणी यांच्या वक्तव्यातून भाजपची मनुवादी मानसिकता दिसून येतेय. भाजपची स्त्रियांना कमी लेखण्याची मानसिकता या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे स्मृती इराणी यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी 'बेटी बचाव बेटी पढाव' चा नारा देत आहेत तर दुसऱ्या बाजूला त्यांचेच मंत्री मातृत्वाचा अपमान करणारे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे भाजपने स्मृती इरानींचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अन्यथा आगामी काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
दरम्यान या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया देताना ही फेक न्यूज असल्याचे स्मृती इराणी यांनी सांगितले.