न्यायालयाच्या नियमांचे पालन करूनच बैलगाडा शर्यत घ्या; प्रकाश जावडेकर यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 07:52 PM2022-05-29T19:52:33+5:302022-05-29T19:52:49+5:30
बैलगाडा संघटनांच्या माध्यमातून न्यायालयीन लढा आपण जिंकला
पिंपरी : आपल्याकडे बैलांना मारत नाहीत, इंजेक्शन देत नाहीत, मुलांप्रमाणे प्रेम करतात. मात्र, काही आक्षेपांमुळे महाराष्ट्राचे आणि भारताचे सांस्कृतिक वैभव अशाणारी बैलगाडा शर्यत बंद झाली होती. आहे. न्यायालययीन लढ्याला यश मिळाले. शर्यंत सुरू झाली आहे. बैलगाडा संस्कृती टिकली पाहिजे, जोपासली पाहिजे. त्यासाठी न्यायालयाच्या नियमांचेही पालन करूनच स्पर्धांचे आयोजन करावे, असे मत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चिखलीत व्यक्त केले.
चिखली जाधववाडी येथील जय हनुमान बैलगाडा मंडळाच्या वतीने रामायण मैदानवर बैलगाडा शर्यत सुरू आहे. शर्यतीच्या तिसऱ्या दिवशी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भेट दिली. यावेळी माजी महापौर राहुल जाधव, नितीन काळजे उपस्थित होते.
प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘‘मी खेड्यातून आलोय, बैलाची निगा किती शेतकरी राखतात. त्याचे औषधपाणी खाणे, पिणे, सगळ्या गोष्टी करतात. मुलाप्रमाणे सांभाळतात. शेतकरी जो प्रेम करतो, त्याला प्रासंगिक महोत्सव साजरे करता आले पाहिजेत. बंद असता कामा नये, त्यासाठी काही पथ्ये असली पाहिजेत. मी केंद्रीय पर्यावरण मंत्री असताना देशातील बैलगाडा शर्यत सुरू करण्याबाबत अध्यादेश काढला. मात्र, काही प्राणीमित्र संघटना न्यायालयात गेल्या. पण, बैलगाडा संघटनांच्या माध्यमातून न्यायालयीन लढा आपण जिंकला. शेतकरी बैल पळवतो, जोपासतो तसे त्याचे आजारपणही पाहतो. वटपूजा जशी होते तशी आम्ही बैलाचीही पुजा आम्ही करतो. तमिळनाडूत जलीकट्टू आणि कर्नाटकात बैलगाडा शर्यतीला कंबाला म्हणतात. तसे महाराष्ट्रातील छकडा हे देशातील ग्रामीण संस्कृतीचे वैभव आहे.’’
राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, ‘‘बैलगाडा ही शेतकऱ्यांची संस्कृती आहे. गावगाड्यात राबणारा शेतकरी बैलांना जीव लावतो. देशी गायीच्या पोटाला जे खोंड येते. त्याला बैलागाडा घाटात पळवले जाते. त्यातून मिळणारे उत्पन्न हे त्या शेतकºयाला जणू पाच एकर शेती एकाच वर्षी पिकावी, असे असते. त्यासाठी देशी गाय, गोवंश वाचला पाहिजे म्हणून प्रयत्न केले. आणि बैलगाडा शर्यत सुरू झाली.’’