शिवसृष्टीच्या जागेबाबत तातडीने निर्णय घ्या, मुक्ता टिळक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 06:43 AM2018-05-14T06:43:32+5:302018-05-14T06:43:32+5:30
महापालिकेच्या वतीने चांदणी चौक येथील बीडीपीच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीचा तिढा अद्याप कायम आहे
पुणे : महापालिकेच्या वतीने चांदणी चौक येथील बीडीपीच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीचा तिढा अद्याप कायम आहे. शिवसृष्टी जागेच्या भूसंपादनाचा तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी नुकतीच शहरातील सर्व आमदार, खासदार, पदाधिकाºयांची बैठक घेतली. या बैठकीबाबत महापौर मुक्ता टिळक यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेऊन माहिती दिली. तसेच शिवसृष्टीबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. दरम्यान, आमदार-खासदारांच्या भूमिकेबाबतचा अहवाल पालिकेच्या वतीने पुढील आठवड्यात शासनाला पाठविण्यात येणार असल्याचे मुक्ता टिळक यांनी सांगितले.
शिवसृष्टीसाठी चांदणी चौक येथील बीडीपीच्या जागा देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखील फेबु्रवारीमध्ये मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक होऊन तीन महिने लोटले तरी अद्याप जागेच्या भूसंपादनाबाबत, बाधितांना देण्यात येणाºया मोबदल्याबाबत काहीच निर्णय झाला नाही.
कचरा प्रकल्पाच्या
जागेचा प्रश्न मार्गी लावा
मुख्यमंत्री विविध कार्यक्रमांसाठी शनिवारी पुण्यात आले होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी शिवसृष्टी व शहराच्या कचरा प्रकल्पांसाठी मंजूर करण्यात आलेल्या शासकीय जागा तातडीने महापालिकेकडे हस्तांतरीत करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन देऊन केली. राज्यशासनाने महापालिकेस दिलेल्या काही जागांवर पालिकेने कचरा प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. मात्र, त्या शासनाच्या मालकीच्या असून त्या शासनाकडून पालिकेस मिळणे अपेक्षित आहे. त्या जागा तातडीने मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती करण्यात आली असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. या जागा मिळाल्यास महापालिकेस नवीन कचरा प्रकल्प उभारणे शक्य होणार असून कचरा समस्या सोडविण्यास मदत होणार आहे.