भाजी घ्या, भाजी..! मेथी ५ रुपये, शाळेतून निघाला आठवडेबाजाराचा सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:24 AM2018-12-29T00:24:15+5:302018-12-29T00:24:34+5:30
शालेय विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी शाळेत विविध उपक्रम राबविण्यात येतात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभुळदरा (भाम) येथे शालेय विद्यार्थ्यांनी आठवडेबाजार भरविला होता.
वाकी बुद्रुक : शालेय विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी शाळेत विविध उपक्रम राबविण्यात येतात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभुळदरा (भाम) येथे शालेय विद्यार्थ्यांनी आठवडेबाजार भरविला होता.
जीवनावश्यक भाजीपाला, कडधान्ये, खाऊचे पदार्थ यांचा समावेश होता. सकाळी ८ वाजता आठवडेबाजाराला सुरुवात झाली होती. वास्तविक जीवनात जगत असताना व्यावहारिक शिक्षणदेखील विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे, या हेतूने हा आठवडेबाजार आयोजिला होता, असे मत शाळेच्या सर्व शिक्षकांनी व्यक्त केले.
सकाळी या कार्यक्रमाच्याउद्घाटनप्रसंगी अनेक मान्यवर, ग्रामस्थ, पालक, शिक्षक उपस्थित होते. भाजीबाजाराचे उद्घाटन खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दिनेश कड, उद्योजक शरद कड, भाजपा उपाध्यक्ष पप्पू चव्हाण, सुधीर कड, राहुल कड, रुपेश कड, सदस्य नितीन कड, अर्जुन कड या मान्यवरांच्या, तसेच अनेक ग्रामस्थांच्या हस्ते झाले. आपल्या घरी असणाऱ्या शेतातून विद्यार्थ्यांनी भाजीपाला, तरकारी, तसेच कडधान्ये विक्रीसाठी आणली होती. मोठमोठ्याने आरोळ्या देत विद्यार्थ्यांनी आपला खप जास्त होण्यासाठी भर दिला होता. दिवसभर सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा आनंद घेतला.