मूर्ती प्रतिष्ठापनेच्या बहाण्याने कर्नाटकात नेले; ५ कोटींच्या खंडणीसाठी पुजाऱ्यासह ७ शिष्यांना डांबून ठेवले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 01:43 PM2024-10-03T13:43:02+5:302024-10-03T13:43:27+5:30

कर्नाटक स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून बिबवेवाडी पोलिस आणि स्थानिक पोलिसांनी त्यांना डांबून ठेवलेल्या ठिकाणी धाड टाकली

taken to Karnataka on the pretext of idol installation 7 disciples along with the priest were detained for the ransom of 5 crores | मूर्ती प्रतिष्ठापनेच्या बहाण्याने कर्नाटकात नेले; ५ कोटींच्या खंडणीसाठी पुजाऱ्यासह ७ शिष्यांना डांबून ठेवले

मूर्ती प्रतिष्ठापनेच्या बहाण्याने कर्नाटकात नेले; ५ कोटींच्या खंडणीसाठी पुजाऱ्यासह ७ शिष्यांना डांबून ठेवले

पुणे : मूर्ती प्रतिष्ठापनेच्या बहाण्याने कर्नाटक येथे नेत पुजाऱ्यासह त्यांच्या सात शिष्यांना डांबून ठेवून तब्बल ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या टोळीतील तिघांना बिबवेवाडीपोलिसांनी बेड्या ठोकल्या. कर्नाटक स्थानिक पोलिस आणि बिबवेवाडी पोलिसांनी ही संयुक्त कामगिरी करत पुजाऱ्यासह त्यांच्या शिष्यांची सुटका केली. तिन्ही आरोपींना ५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

रामू अप्पाराय वळबन (२९, रा. त्रिकुंडी, ता. जत, सांगली), दत्ता शिवाजी करे (२०) आणि हर्षद सुरेश पाटील (२२, रा. आसंगी, ता. जत, जि. सांगली), अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत बजरंग तुळशीराम लांडे (५१, रा. पीएमटी कॉलनी, समर्थनगर, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजरंग लांडे हे पुजारी आहेत. तर इतर अपहरण झालेली मुले ही त्यांचे शिष्य आहेत. दि. २९ जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास बजरंग लांडे यांचा मुलगा स्वप्निल याला आरोपी घरी येऊन भेटले. त्यांनी स्वप्निलला विजापूर येथे हर्षद पाटील याच्या घराची पूजा करायची आहे तसेच मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे, असे सांगून कर्नाटक येथे बोलवले. त्यानुसार फिर्यादी लांडे व त्यांचे सात शिष्य कर्नाटक येथे बोलवल्याप्रमाणे गेले. तेथे गेल्यानंतर त्यांना कोणत्याही घराची पूजा अथवा मूर्ती प्रतिष्ठापनेची तयारी दिसली नाही. थोड्या वेळाने त्यांनी आरोपींशी चर्चा केल्यानंतर त्यांना एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. त्याचवेळी आरोपींनी बजरंग लांडे यांच्या फोनवरून त्यांच्या घरच्यांना फोन लावून ५ कोटींच्या खंडणीची मागणी केली.

त्यांच्याबरोबर इतरही शिष्य असल्याने लांडे यांच्या घरच्यांनी बिबवेवाडी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस उपायुक्त आर. राजा, बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगल मोंढवे, गुन्हे निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलिस कर्मचारी ज्योतिष काळे, विशाल ताकपेरे यांच्यासह पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषणानंतर ते कर्नाटक येथील रायचूर येथील एका गावात असल्याचे पोलिसांना समजले. त्यासाठी कर्नाटक स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून बिबवेवाडी पोलिस आणि स्थानिक पोलिसांनी त्यांना डांबून ठेवलेल्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी पुजारी लांडे यांच्यासह सात पुजारी शिष्याची यावेळी सुटका करण्यात आली. तर तीन आरेापींना बेड्या ठोकण्यात आल्या.

या गुन्ह्यात पुजाऱ्यासह त्यांच्या सात शिष्यांचे अपहरण करण्यात आले होते. याची माहिती मिळताच तांत्रिक विश्लेषण करून अपहरण करण्यात आलेल्यांचा माग काढण्यात आला. सर्व जण कर्नाटक येथे असल्याची खात्री झाल्यानंतर कर्नाटक पोलिसांची मदत घेऊन आमच्या पथकाने सर्वांची सुटका करत तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयाने ५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. -मनोजकुमार लोंढे, गुन्हे निरीक्षक, बिबवेवाडी पोलिस ठाणे

Web Title: taken to Karnataka on the pretext of idol installation 7 disciples along with the priest were detained for the ransom of 5 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.