Pune Crime: पत्नीशी वादाचा फायदा घेत डाॅक्टरला पुण्य-स्वर्गाचे आमिष! ५ कोटींचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Published: April 13, 2024 07:25 PM2024-04-13T19:25:20+5:302024-04-13T19:26:15+5:30
एका डॉक्टरला पाच जणांनी धार्मिक गोष्टी, पुण्य आणि स्वर्गाचे आमिष दाखवून तब्बल ५ कोटी ३७ लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...
पुणे : पत्नीसोबत सुरू असलेल्या कौटूंबिक वादाचा फायदा घेत एका डॉक्टरला पाच जणांनी धार्मिक गोष्टी, पुण्य आणि स्वर्गाचे आमिष दाखवून तब्बल ५ कोटी ३७ लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोंढवापोलिसांनी सादीक अब्दुलमजीद शेख, यास्मीन सादीक शेख, एतेशाम सादीक शेख, अम्मार सादीक शेख,राज आढाव उर्फ नरसू यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी, डॉ. अहमदअली इनामअली कुरेशी (वय-६७,रा.एनआयबीएम) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १७ ऑक्टोबर २०२१८ ते 12 एप्रिल २०२४ या कालावधीत घडली आहे. फिर्यादी डॉ. कुरेशी हे धार्मिक प्रार्थनेसाठी प्रार्थनास्थळात गेले होते. त्यावेळी त्यांचा सादीक याच्यासोबत परिचय झाला. पुढे सादीक आणि कुरेशी यांची ओळख वाढत गेली. डॉ. कुरेशी यांनी पत्नीसोबत सुरू असलेला कौटुंबिक वाद सादीकच्या कानावर घातला. त्याच संधीचा फायदा घेत सादीकने कुरेशी यांना घाबरवले. फिर्यादी यांच्यसोबत वेळोवेळी गोड बोलून धार्मिक गोष्टी सांगून त्यांना प्रभावित केले. त्यांना पुण्य कमावून स्वर्ग मिळवण्याचे आमिष दाखवले. तसेच वेळोवेळी फिर्यीदी यांच्या मालमत्तेचे 11 बक्षीसपत्र स्वत:च्या नावावर करुन घेतले.
तसेच फिर्यादी यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याच्या वस्तू आणि सोन्याचे बिस्किटे इत्यादी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता उकळली. काही रोकड, सोन्याच्या वस्तू असा ५ कोटी ३७ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज आरोपींनी डॉक्टर कुरेशी यांच्याकडून फसवणूक करून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. कुरेशी यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दिली होती. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील करीत आहेत.