चिमुकली घेतात धोकादायक शाळेत शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 05:33 AM2017-11-13T05:33:09+5:302017-11-13T05:33:52+5:30
नव्याने पुणे महानगरपालिकेमध्ये आंबेगाव खुर्द समाविष्ट झाले खरे, पण कामांचा मुहूर्त लागणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गरिबांचे चिमुकले जीव शिक्षण घेत असलेल्या जिल्हा परिषद शाळेची एक वर्गखोली मोडकळीस आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आंबेगाव खुर्द : नव्याने पुणे महानगरपालिकेमध्ये आंबेगाव खुर्द समाविष्ट झाले खरे, पण कामांचा मुहूर्त लागणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गरिबांचे चिमुकले जीव शिक्षण घेत असलेल्या जिल्हा परिषद शाळेची एक वर्गखोली मोडकळीस आली आहे. वारंवार जिल्हा परिषद बांधकाम व शिक्षण विभागाकडे तक्रार करूनसुद्धा झोपलेल्या प्रशासनाला जाग येत नाही. काही अपघात झाला, तर लहान मुलांना नाहक धोका होण्याची शक्यता आहे.
जीव मुठीत घेऊन चिमुकली या पडझड होत असलेल्या शाळेत शिक्षणाचे धडे घेत आहेत. भविष्यकाळातील स्वप्ने घेऊन, या शाळेत दाखल केलेल्या पालकांना प्रशासनाविषयी काय वाटत असेल? या जिल्हा परिषद शाळेमध्ये सामान्य कष्टकरी मजुरांची मुले शिक्षण घेत आहेत. बहुधा त्यामुळेच प्रशासन लक्ष देत नसावे, असा प्रश्न सामान्य पालकांना पडला आहे. ही इमारत वीस वर्षांपूर्वी बांधलेली आहे. प्रशासनाने साधी दुरुस्तीसुद्धा केल्याचे दिसत नाही.
बाकीच्या दोन्ही वर्गखोल्या पावसाळ्यात गळतात. पावसाळ्यात या चिमुकल्यांना शिक्षण घेताना कोपर्याचा आधार घेऊन शिक्षण घ्यावे लागते. प्रशासकीय अधिकार्यांनी भेट देऊन या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी आंबेगाव खुर्दच्या नागरिकांनी केली आहे.
४जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीबाबत शिक्षण विभाग व बांधकाम विभागास वेळोवेळी माहिती दिली जात होती. तरीही प्रशासन टाळाटाळ करत आहे प्रशासनाने लवकर इमारत दुरुस्ती करावी.
- प्रसाद जगताप, माजी सदस्य, आंबेगाव खु.