पूर्व वैम्यनस्यातून भांडणाचा सूड घेत तरुणावर कोयत्याने केले सपासप वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 15:24 IST2021-04-11T15:24:00+5:302021-04-11T15:24:38+5:30
तरुण गंभीर जखमी

पूर्व वैम्यनस्यातून भांडणाचा सूड घेत तरुणावर कोयत्याने केले सपासप वार
पिंपरी: पूर्व वैम्यनस्यातून झालेल्या भांडणाचा सूड घेण्यासाठी एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केले आहे. मोहननगर, चिंचवड येथे शनिवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली.
आकाश उर्फ बाळा शिवाजी सलगर (वय २७), असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. दत्तात्रय रंगनाथ वाघमोडे (वय ३८, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुभम गणेश राठोड (वय २६), आदित्य गणेश राठोड (वय २४, दोन्ही रा. मोई) व त्यांचे इतर दोन साथीदार अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून आकाश यांना मारहाण केली. तू आमच्यावर ट्रॅप लावतो काय, असे म्हणून आरोपींनी लोखंडी कोयत्याने व सूऱ्याने मारहाण केली. त्यांना गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक रमेश केंगार पुढील तपास करत आहेत.