ताल-सूर अन् आठवणींत रंगला सोहळा"
By admin | Published: April 26, 2017 04:19 AM2017-04-26T04:19:54+5:302017-04-26T04:19:54+5:30
कसदार आवाजात गायक सुरेश वाडकर यांनी ‘ऐ जिंदगी गले लगा ले’ हे गाणे सादर करत रसिकांवर केलेली सुरांची पखरण... अंध
पुणे : कसदार आवाजात गायक सुरेश वाडकर यांनी ‘ऐ जिंदगी गले लगा ले’ हे गाणे सादर करत रसिकांवर केलेली सुरांची पखरण... अंध क्रिकेटपटू अमोल करचे याने क्रिकेटमधील प्रवासाच्या आठवणींना दिलेला उजाळा... चिमुरड्या सोहम गोराणेने तबलावादनातून निर्माण केलेले नादमाधुर्य... जिया वाडकरने ‘चंदा चमके चम चम’ या गाण्याने प्रेक्षकांची मिळालेली वाहवा... ‘एलिझाबेथ एकादशी’फेम श्रीरंग महाजनने सादर केलेला व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘करुणाष्टक’मधील सादर केलेला यांचा उतारा, अशा वातावरणात शाहू मोडक स्मृती पुरस्काराचा सोहळा रंगला.
मराठी चित्रसृष्टीतील कलावंत शाहू मोडक यांच्या जन्मदिनानिमित्त यंदाचा २३वा शाहू मोडक स्मृती पुरस्कार समारंभ मंगळवारी बालगंधर्व रंगमंदिरात प्रतिष्ठानतर्फे पार पडला. त्या वेळी अध्यक्षस्थानी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, तर प्रमुख पाहुणे म्हणून गायक सुरेश वाडकर आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे उपस्थित होते. या वेळी श्रीरंग महाजन (बालकलाकार), जिया वाडकर (संगीत), सोहम गोराणे (वाद्य), दत्तात्रय अत्रे (ज्योतिष), जिद्द (अमोल करचे) आदी कलाकारांचा सन्मान करण्यात आला. पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झालेल्या ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अनेक दिवसांपासून बोलावणे येत होते. मात्र, सत्ता गेल्यानंतर उपस्थित राहण्याचा योग आला, अशी मिस्कील टिप्पणी करत हरिद्वारला एका साधूकडे श्रीकृष्ण म्हणून शाहू मोडक यांचेच छायाचित्र होते, अशी आठवण त्यांनी सांगितली. हे चिमुरडे कलाकार म्हणजे भविष्यातील फुले असून, त्यांचा सुगंध महाराष्ट्रभर पसरू दे, असे शिंदे यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘आज माझ्या दोन्ही मुली माझ्या आजी-आजोबांचा वारसा पुढे चालवत आहेत आणि या वाटचालीत त्या यशस्वी होतील, एवढीच प्रार्थना करेन. पुणेकर रसिक गाण्याबाबतीत चोखंदळ आहेत. नवीन लोकांच्या छमखटीत जुने गायक मागे पडत आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
कसोटी क्रिकेट खेळलो असल्याने सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. आता सरळपणानेच बोलेन, असे सांगत चंदू बोर्डे यांनी शाहू मोडक यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रतिभा शाहू मोडक यांनी प्रास्ताविक केले.
सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)