मावळ तालुक्यात १ लाखाची लाच घेताना तलाठ्यासह तिघे जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 08:22 PM2020-03-12T20:22:28+5:302020-03-12T20:25:40+5:30
खरेदी केलेल्या जमिनीची नोंद सात-बाऱ्यावर करण्यासाठी २ लाख २० हजार रुपयांची केली होती मागणी
पुणे : मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असतात. या व्यवहारांची सात-बाऱ्यावर नोंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी केली जात असल्याचे मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्ले येथे केलेल्या कारवाईत निष्पन्न झाले. खरेदी केलेल्या जमिनीची नोंद सात-बाऱ्यावर करण्यासाठी २ लाख २० हजार रुपयांची मागणी करून त्यापैकी १ लाख रुपये स्वीकारताना कार्ल्याचा तलाठी व त्याच्या दोन साथीदारांना पकडले आहे.
धनश्याम शंकर सोमवंशी (वय ४३, रा. सजा कार्ले, ता. मावळ) असे या तलाठ्याचे नाव आहे. गणेश गोपीनाथ वायकर, अविनाश सुनील देवकर (दोघे रा. कार्ले, ता़ मावळ) या दोन खासगी व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत मुंबई येथील तक्रारदाराने मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली होती. तक्रारदारांनी कार्ले येथे जमीन खरेदी केली होती. या जमिनीची नोंद सात-बाऱ्यावर घेण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी तलाठी सोमवंशी याने त्यांच्याकडे २ लाख २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्याची तक्रार तक्रारदारांनी मुंबई कार्यालयात केली होती. त्याची पडताळणी ६ मार्च रोजी करण्यात आली. त्यात तलाठी सोमवंशी लाच मागत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मुंबईचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक तक्रारदारासह कार्ले येथे आले. त्यांनी गुरुवारी सापळा रचला. तलाठ्याच्या वतीने १ लाख रुपये घेताना गणेश वायकर याला पकडण्यात आले. पडताळणीत अविनाश देवकर यांचेही नाव असल्याने त्याच्यासह तलाठी सोमवंशी यालाही पकडण्यात आले आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
०००