तलाठीच झाला वाळूवाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 01:44 AM2018-10-16T01:44:17+5:302018-10-16T01:44:59+5:30
तलाठ्याचे ग्रामस्थांशी वर्तन अत्यंत अरेरावीचे आहेच, शिवाय तो याच परिसरात नातेवाइकाला हाताशी धरून वाळूचा उपसाही करत असल्याची लेखी तक्रार नाझरे क. प. ग्रामपंचायतीने पुरंदरच्या तहसीलदारांना दिली आहे.
जेजुरी : जेव्हा कुंपणच शेत खाते.. अशी एक म्हण प्रचलित आहे. अगदी तिचाच प्रत्यय आला आहे पुरंदर तालुक्यातील नाझरे क. प. येथील गाव कामगार तलाठ्याबाबत. या तलाठ्याचे ग्रामस्थांशी वर्तन अत्यंत अरेरावीचे आहेच, शिवाय तो याच परिसरात नातेवाइकाला हाताशी धरून वाळूचा उपसाही करत असल्याची लेखी तक्रार नाझरे क. प. ग्रामपंचायतीने पुरंदरच्या तहसीलदारांना दिली आहे.
असे बेकायदा धंदे करणाऱ्या तलाठ्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली आहे. ज्याने वाळूची तस्करी रोखवयास पाहिजे, तोच वाळूची तस्करी करीत असल्याची या परिसरात चर्चा आहे.
नाझरे क.प. येथील गाव कामगार तलाठी महादेव जरांडे यांच्या ग्रामस्थांशी होत असलेल्या गैरवर्तनाबाबत नझारे क.प. ग्रामस्थांनी आज पुरंदरचे तहसीलदार अतुल म्हेत्रे यांची भेट घेऊन तक्रार केली आहे. तक्रारीत येथील चारुदत्त नाझीरकर हा ग्रामस्थ मुलीच्या दवाखान्यासंदर्भात उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी तलाठी कार्यालयात गेला असता तलाठी दारूच्या नशेत असल्याचे निदर्शनास आले. शिवाय, त्याने ग्रामस्थांशी उद्धट वर्तन करीत कार्यालयाबाहेर हाकलून लावले.
या तक्रारीनुसार ग्रामपंचायतने थेट तहसीलदार अतुल म्हेत्रे यांच्याकडेच लेखी तक्रार दीली आहे.चौकशी करून कारवाई न झाल्यास येत्या शुक्रवार दि. १९ आॅक्टोबरपासून उपोषण आंदोलन करण्याचा इशारा ही देण्यात आला आहे. तहसीलदार म्हेत्रे यांनी या तक्रारीची त्वरित दखल घेत मंडळाधिकारी ज्ञानदेव यादव यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
यासंदर्भात मंडलाधिकारी यादव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ताबडतोब चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश आपणास दिले असून चौकशीची प्रक्रिया आजपासूनच राबवण्यात आल्याचे सांगीतले.
ग्रामस्थांची होणारी अडवणूक, उतारे, दाखल्यासाठी हेलपाटे मारावयास लावले जाते. अरेरावी केली जाते. कायमस्वरूपी कामाच्या ठिकाणी मद्यपान करून लोकांची अडवणूक केली जाते.
याशिवाय या तलाठ्याने स्वत:च्या नातेवाइकाला हाताशी धरून जेसीबी मशीनद्वारे पांडेश्वर, जवळार्जुन, बारामती, पुरंदरलगतच्या कºहा नदी पात्रातून रात्रीच्या वेळी वाळू उपसा करत आहे. याबाबत तक्रारी अर्ज दिला तर तो फाडून टाकण्यात येतो. अशा गंभीर स्वरूपाच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत.