बारामती: नोंदणीसाठी १० हजारांची लाच घेताना तलाठी ACB च्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 06:31 PM2021-11-17T18:31:03+5:302021-11-17T18:33:21+5:30
तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीची पडताळणी बुधवारी करण्यात आली. त्यात तलाठी मधुकर खोमणे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले...
पुणे : जमिनीचे क्षेत्र दुरुस्तीची नोंद करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून बारामती तालुक्यातील सजा निंबुतच्या तलाठ्याला रंगेहाथ पकडले. मधुकर मारुती खोमणे (वय ५८) असे या तलाठ्याचे नाव आहे. तक्रारदार यांचे वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीचे क्षेत्र दुरुस्तीची नोंद करण्यासाठी तक्रारदारांनी अर्ज केला होता. ही नोंद करण्यासाठी तलाठी मधुकर खोमणे याने त्यांच्याकडे १० हजार रुपयांची लाच मागितली होती.
याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीची पडताळणी बुधवारी करण्यात आली. त्यात तलाठी मधुकर खोमणे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सजा निंबुत येथील तलाठी कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच घेताना खोमणे यांना पकडण्यात आले. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संदीप वर्हाडे तपास करीत आहेत.