तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर; २३ जिल्ह्यांतील पदांसाठी तीन आठवड्यांत निवड यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 10:51 AM2024-01-07T10:51:52+5:302024-01-07T10:52:32+5:30
अंतिम निवड यादीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. १३ जिल्ह्यांमधील पेसा अर्थात आदिवासीबहूल क्षेत्रातील रिक्त जागांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असल्याने, हे जिल्हे वगळून अन्य २३ जिल्ह्यांमधील अंतिम निवड यादीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार आहे. पुढील तीन आठवड्यांत यशस्वी उमेदवारांची यादी भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली.
परीक्षा क्रमांकानुसार यादी
- उमेदवारांची जास्त संख्या असल्याने गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी मोठा काळ लागल्याचे नरके यांनी सांगितले. गुणवत्ता यादी तयार करताना एका सॉफ्टवेअरची मदत घेण्यात आली आहे.
- प्रत्येक क्षेत्रातील शंभर प्रश्नांपैकी काठिण्य पातळीनुसार हे गुण देण्यात आले आहेत. हे काम पूर्णपणे सॉफ्टवेअरनेच केले आहे. या प्रक्रियेला सामान्यीकरण असे म्हटले जाते.
पेसा अर्थात, आदिवासीबहूल क्षेत्रातील १३ जिल्ह्यांमधील ५७४ जागांबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच घेण्यात येणार आहे. त्यानंतर येथील निवड प्रक्रियेची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
- सरिता नरके, राज्य समन्वयक, तलाठी परीक्षा