तलाठी भरतीचा निकाल येत्या आठवडाभरात? 'या' दिवशी निवडपत्रे देण्याचे नियोजन

By नितीन चौधरी | Published: January 4, 2024 03:39 PM2024-01-04T15:39:30+5:302024-01-04T15:42:17+5:30

तलाठी भरती परीक्षेसाठी राज्यातील साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते...

Talathi recruitment results in the next week? Planning to give election papers on 'this' day | तलाठी भरतीचा निकाल येत्या आठवडाभरात? 'या' दिवशी निवडपत्रे देण्याचे नियोजन

तलाठी भरतीचा निकाल येत्या आठवडाभरात? 'या' दिवशी निवडपत्रे देण्याचे नियोजन

पुणे : तलाठी भरती परीक्षेची गुणवत्तायादी येत्या आठवडाभरात लागण्याची शक्यता असून त्यानंतर जिल्हा स्तरावरील निवड यादी जाहीर केली जाणार आहे. याबाबत गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम टीसीएस कंपनीकडून युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती अतिरिक्त जमाबंदी आयुक्त व तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली. दरम्यान, निवड झालेल्या उमेदवारांना २६ जानेवारी रोजी निवडपत्रे देण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सुत्रांनी दिली.

तलाठी भरती परीक्षेसाठी राज्यातील साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीनंतर ४ हजार ४६६ जागांसाठी १० लाख ४१ हजार ७१३ एवढे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्यात आली. उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही आक्षेप, हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान मुदत देण्यात आली होती. संपूर्ण परीक्षेत एकूण ५ हजार ७०० श्नांपैकी २ हजार ८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांनी नोंदवले होते. या आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९ हजार ७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले आहेत.

त्यानुसार कंपनीने १४६ प्रश्नांमध्ये दुरुस्ती केली आहे. त्यानंतरही प्रश्नांवर आलेल्या आक्षेपांमधून ७ आक्षेप ग्राह्य धरण्यात आले आहेत. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया लांबली असल्याची माहिती नरके यांनी दिली. मोठ्या संख्येने उमेदवार असणे आणि आक्षेपानंतर आलेल्या अडचणी बघता निकालाला विलंब होत असल्याचे त्या म्हणाल्या. निकालासंदर्भातील बहुतांश काम पूर्ण होत आले आहे. गुणवत्ता यादी तयार करणे, जिल्हानिहाय निकाल जाहीर करणे असे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान ही प्रक्रिया २६ जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन असून निवड झालेल्या उमेदवारांना २६ जानेवारी रोजी निवडपत्रे देण्यात येतील अशी शक्यता जिल्हा प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बोलून दाखवली.

परीक्षार्थींची संख्या फार मोठी असून कुठल्याही परीक्षार्थीवर अन्याय होऊ नये, म्हणून अगदी काटेकोरपणे, कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे. आठवडाभरात गुणवत्तायादी जाहीर होण्याची शक्यता आहे. जानेवारीअखेर नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
- सरिता नरके, अतिरिक्त जमाबंदी आयुक्त व राज्य समन्वयक, तलाठी भरती परीक्षा

Web Title: Talathi recruitment results in the next week? Planning to give election papers on 'this' day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.