सातबारा उताऱ्यावरील नोंदीसाठी ३० हजारांची लाच मागणारा तलाठी जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 09:02 PM2021-09-27T21:02:28+5:302021-09-27T21:02:42+5:30
लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तलाठ्याला पकडले.
पुणे : मृत्युपत्राची व हक्क सोडपत्राची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तलाठ्याला पकडले.
मारुती अंकुश पवार (वय ४१, रा. चर्होली बुद्रुक) असे या तलाठ्याचे नाव आहे. मृत्युपत्राची व हक्क सोडपत्राची नोंद सात बारा उताऱ्यावर घेण्यासाठी तक्रारदार यांनी चर्होली बु्द्रुकचे तलाठी मारुती पवार याच्याशी संपर्क साधला होता. यावेळी पवार याने ५० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्याची पडताळणी २३ व २४ सप्टेंबर रोजी करण्यात आली.
पडताळणीत पवार याने ३० हजार रुपये घेण्यास तडजोड केली. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चर्होली बुद्रुक येथील तलाठी कार्यालयात सोमवारी सापळा लावला. तक्रारदाराकडून ३० हजार रुपये स्वीकारताना पवार याला पकडण्यात आले. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार अधिक तपास करीत आहेत.