सात बारावर नोंदीसाठी लाच घेणारा तलाठी जाळ्यात, साथीदारासह तलाठीला लाच लुचपतने केली अटक
By विवेक भुसे | Published: November 8, 2023 11:21 AM2023-11-08T11:21:22+5:302023-11-08T11:24:02+5:30
आजोबांनी तक्रारदार यांना बक्षीसपत्राने ३९ गुंठे जमीन दिली होती...
पुणे : बक्षीसपत्र म्हणून दिलेल्या जमिनीची नोंद सात बारावर करण्यासाठी लाच घेताना तलाठी व त्याच्या साथीदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. तलाठी निलेश सुभाष गद्रे (वय ४२, रा. सजा सोनोरी, ता. पुरंदर) आणि खासगी व्यक्ती आदित्य मधुकर कुंभारकर (वय २१, रा. वजपुरी, ता. पुरंदर) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत एका ३२ वर्षाच्या शेतकर्याने तक्रार दिली होती. त्यांच्या आजोबांनी तक्रारदार यांना बक्षीसपत्राने ३९ गुंठे जमीन दिली होती. या बक्षीसपत्राची नोंद सात बारा उतार्यावर करण्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज सजा सोनोरी तलाठी कार्यालयास दिलेला होता. तलाठी निलेश गद्रे याने तक्रारदार यांच्याकडे बक्षीसपत्राची नोंद सात बारावर करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितली.
लाच लुपत प्रतिबंधक विभागाने याची पडताळणी केल्यावर दिवे गाव येथील तलाठी कार्यालयात सापळा रचला. तक्रारदारांकडून आदित्य कुंभारकर याने ५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर तपास करीत आहेत.