खेड तालुक्यातील तलाठी झाले हायटेक
By Admin | Published: January 7, 2016 01:35 AM2016-01-07T01:35:22+5:302016-01-07T01:35:22+5:30
खेड तालुक्यातील गावोगावच्या तलाठी कार्यालयांमध्ये तलाठी (भाऊसाहेब) संगणकासमोर बसून माऊसवर हात फिरवत झटपट उतारे मिलत आहे
पाईट : खेड तालुक्यातील गावोगावच्या तलाठी कार्यालयांमध्ये तलाठी (भाऊसाहेब) संगणकासमोर बसून माऊसवर हात फिरवत झटपट उतारे मिलत आहे. त्यामुळे बळीराजाला संगणकीकृत अपडेट सातबारा उतारे मिळत असल्याने तलाठी आता हायटेक झाल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.
महाराष्ट्र शासनाच्या संगणकीकृत सातबारा या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये खेड तालुक्याने आघाडी घेतली असली तरी अद्याप या योजनेमध्ये मोठ्या त्रुटी राहिल्या असल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक कामे रखडत आहेत. असे होत असले तरी गावोगावी भाऊसाहेब मात्र लॅपटॉप घेऊन तलाठी कार्यालयात काम करताना दिसत आहेत.
सध्या अनेक भाऊसाहेबांना या संगणकप्रणाली जुळवून घेताना मोठी कसरत करावी लागते. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेकांनी ते समजावून घेण्याऐवजी तालुक्यातील संगणक कक्षाचा आधार घेत कामकाज करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
फेरफार आज्ञावलीअंतर्गत खेड तालुक्यातील सर्व डाटा स्टेट डाटा सेंटरवर अपलोड झाला आहे. संगणकीकृत सातबाराचे सर्व कामकाज २३ आॅक्टोबरमध्ये पूर्ण अपेक्षित असताना ते डिसेंबरअखेर पूर्ण झाले आहे. आता संगणकीकृत सातबारा उतारे तलाठी कार्यालयातून मिळण्यास सुरुवात झाली असली, तरी सध्या २५ टक्के सातबारावर त्रुटी राहिल्या असल्या तरी त्या दूर करण्याच्या कामात सर्व तलाठी एकवटले असल्याचे दिसत असून, या प्रणालीमुळे अनेक अडचणी दूर होणार आहेत. कामकाजाला मोठी गती मिळत असल्याचे दिसत आहे. यामध्ये तो सध्या आॅनलाईन फेरफार व त्यांच्या नोंदी सातबारावर होत असल्याचे दिसत आहे.
खेड तालुक्यात संगणकावर सातबारे मिळू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र या यंत्रणेमध्ये काही प्रमाणात त्रुटी असल्याने अडचण निर्माण होत आहे. ती दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.