तळेगाव ढमढेरेला बिबट्याची दहशत
By admin | Published: April 25, 2017 03:50 AM2017-04-25T03:50:54+5:302017-04-25T03:50:54+5:30
परिसरात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने वाड्यावस्त्यांवरील नागरिक सायंकाळनंतर घराबाहेरही पडत नाहीत.
तळेगाव ढमढेरे : परिसरात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने वाड्यावस्त्यांवरील नागरिक सायंकाळनंतर घराबाहेरही पडत नाहीत.
बिबट्याच्या वावराबाबत वनविभागाचे बी. ए. गायकवाड यांनी सांगितले, की तळेगाव ढमढेरे परिसरात भोसे वस्ती, कवटीचा मळा, खंडोबा मंदिर परिसर, गुरव मळा, जगताप वस्ती, कमेवाडी आदी परिसरात बिबट्याने दि. १६ रोजी खंडोबा मंदिरानजीक वासरावर हल्ला केला. दि. २२ रोजी गुरवमळा येथे तर २३ रोजी भोसे वस्ती येथे पाळीव जनावरांवर हल्ले केले आहेत.
या तीनही घटनेत तीन प्राण्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला
आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खंडोबा मंदिराच्या पूर्व दिशेला
उमेश ढमढेरे यांच्या शेतीच्या हद्दीत शनिवार, दि. २२ रोजी पिंजरा
लावला आहे. परंतु अद्याप बिबट्या जेरबंद झालेला नाही. साधारण ५ किलोमीटर अंतरावर गुरवमळा
येथे शेतकऱ्यांना २ ते ३ वेळा बिबट्याचे दर्शन झाल्याने
येथील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने दिवसभर विजेचा लपंडाव चाललेला असतो. त्यामुळे
पिकांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी मोटारी चालू करून पाणी द्यावे लागते. एका शेतकऱ्याच्या शेतीला पाणी द्यायचे म्हटले तरी वस्तीवरील शेतकरी ग्रुपने टेंबे लावून शेतामध्ये पाणी देण्यास जात आहेत. परंतु बिबट्या इकडून येतो, की तिकडून येतो ही भीती मात्र मनामध्ये घर करून बसल्याचे शेतकरी सांगत आहेत. (वार्ताहर)