पाणीबचतीसाठी तळेगावात प्रयत्न
By admin | Published: April 26, 2016 02:19 AM2016-04-26T02:19:49+5:302016-04-26T02:19:49+5:30
दुष्काळी परिस्थिती आणि धरणातील कमी पाणीसाठ्याचा विचार करता आगामी दोन महिने शहरास पाणीपुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी नगरपालिकेने जलबचत अभियानाद्वारे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.
तळेगाव स्टेशन : दुष्काळी परिस्थिती आणि धरणातील कमी पाणीसाठ्याचा विचार करता आगामी दोन महिने शहरास पाणीपुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी नगरपालिकेने जलबचत अभियानाद्वारे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी जलबचत अभियानास नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पाणीपुरवठा समितीचे सभापती व उपनगराध्यक्ष गणेश खांडगे यांनी केले आहे.
याबाबत खांडगे म्हणाले, ‘‘पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नगर परिषदेत सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी आणि अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. त्यात घेण्यात आलेल्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात गाव भागातील सार्वजनिक नळकोंडाळी, गृहसंकुलातील पाण्याच्या टाक्या आणि गळतीच्या ठिकाणांवर पाणी वाया जाणार नाही, अशा उपाययोजनांचे काम सुरू केले आहे. रविवारपर्यंत ११२ नळांना तोट्या बसविण्यात आल्या. त्याची नोंद केली आहे. पाणी विभागाचे कर्मचारी आणि सुमारे १५० जलदूतांच्या साहाय्याने त्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. जर पुन्हा तोट्या काढल्या गेल्या, तर संबंधितांचे नळजोड तोडून दंडात्मक कारवाई केली जाईल. गावभागातील मोहिमेनंतर स्टेशन भागातही मोहीम येत्या आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सहकार्याने पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत सुरू ठेवता येईल. (वार्ताहर)