...तर २ डिसेंबरला तळेगाव एमआयडीसी बंद करणार" आमदार सुनील शेळके यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 01:34 PM2022-12-01T13:34:31+5:302022-12-01T13:34:51+5:30
गेल्या ४२ दिवसांपासून पुणे येथील कामगार आयुक्तांच्या कार्यालयाजवळ ठिय्या आंदोलन सुरू
वडगाव मावळ : एल ॲंड टी कंपनीच्या व्यवस्थापकांनी कामगारांना १ डिसेंबरपर्यंत योग्य न्याय दिला नाही तर २ डिसेंबरला सर्वपक्ष संघटना व स्थानिक भूमिपुत्रांच्या उपस्थितीत तळेगाव एमआयडीसी बंद करण्याचा इशारा आमदार सुनील शेळके यांनी दिला आहे.
आमदार शेळके यांनी वडगाव येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या कंपनीतील कामगारांनी न्याय मिळण्यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न केले. गेल्या ४२ दिवसांपासून पुणे येथील कामगार आयुक्तांच्या कार्यालयाजवळ ठिय्या आंदोलन सुरू आहे. कामगार रोज सकाळी जातात आंदोलन करून परत घरी येतात. कामगार आयुक्तालय व कंपनी व्यवस्थापन यांच्या मध्यस्थीने बैठकीतून मार्ग निघेल, अशी अपेक्षा होती; परंतु, स्थानिक भूमिपुत्रांना वाऱ्यावर सोडून कंपनी चालवून दाखवू, अशी आडमुठेपणाची भूमिका कंपनी व्यवस्थापन घेत आहे.
राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्र या
कंपन्या स्वतःच्या हितासाठी नफेखोरीसाठी जर अशा पद्धतीने काम करणार असतील तर अशा कंपन्यांच्या विरोधात लढा उभारण्याची गरज आहे. कामगार हे सगळ्या पक्षातील आहेत. कामगारांच्या हितासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र या, असे आवाहन आमदार शेळके यांनी केले आहे.
कामगारांच्या पाठीशी : खासदार श्रीरंग बारणे
खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्याचे मंत्री उदय सामंत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, एल ॲंड टी कंपनीत स्थानिक भूमिपुत्र सात ते आठ वर्षांपासून काम करत आहेत. कंपनीने गेल्या काही दिवसांपासून कामगारांची पिळवणूक, शोषण करण्याचे काम केले होते. तेथील कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारल्यामुळे तेथील कामगारांच्या विविध ठिकाणी बदल्या केल्या तर काहींना कामावरून काढून टाकले. कामगारांना मानसिक त्रास देण्याचे काम सुरू केले आहे, आपण लक्ष घालून कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.