तळेगावचा ऊस निघाला दुबईला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 01:50 AM2018-09-19T01:50:22+5:302018-09-19T06:59:57+5:30
आत्तापर्यंत तीन शेतकऱ्यांचा २०० टन ऊस दुबईला रवाना
तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे विठ्ठलवाडी परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस आता दुबईला रवाना होऊ लागला आहे.
सध्याच्या मंदीच्या काळातही शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी परिसरातील प्रगतिशील शेतकरी सोपान गणपतराव गवारी, जालिंदर भाऊसाहेब ढमढेरे व विजय काळूराम शिंदे या तीन शेतकºयांचा २०० टन ऊस आत्तापर्यंत दुबईला रवाना केलेला आहे. सध्या मंदीचे वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या उसाला टनाला २ हजार ५५० रुपये भाव दिला जात असून, परिसरात इतर व्यापाºयांच्या तुलनेत हा बाजारभाव चांगला मिळत असल्याने शेतकरीवर्ग आनंदी आहे. शिरूर तालुक्यातील शेतकºयांच्या शेतातील ऊस रसवंतीसाठी प्रथमच थेट दुबईला जात आहे. शेतकºयांच्या उसाची गुणवत्ता पाहूनच उसाची निवड करून हा ऊस दुबईला पाठविण्यात येतो.
थेट शेतकºयांच्या शेतातून ट्रकने मुंबई येथील न्हावाशिवा बंदरापर्यंत व पुढे बोटीच्या साह्याने समुद्रातून दुबई येथील व्यापारी आयूब खान यांच्याकडे रवाना केला जातो. हा ऊस पुढे रसवंतिगृहासाठी पाठविण्यात येतो, असे संपत गवारी यांनी सांगितले. सध्या मंदीचे वातावरण व पाऊस आणि थंडी यांमुळेही उसाला मागणी कमी आहे.
आजपर्यंत मुंबई, दिल्ली, हरियाणा, ग्वाल्हेर, हैदराबाद, जम्मू आदी भागांमध्ये या परिसरातील शेतकºयांच्या शेतातील ऊस हा उसाच्या गुणवत्तेनुसार पाठविला गेलेला आहे. परंतु, आता शिरूर तालुक्यातील दर्जेदार ऊस प्रथमच दुबई येथे रवाना होत आहे. -संपत गवारी, ऊस व्यापारी- विठ्ठलवाडी
साधारण २५ हजार रुपये एवढ्या कमीत कमी खर्चामध्ये अवघ्या दहा महिन्यांत बारा फुटी लांब कांड्यांचे उसाचे उत्पादन एकरी ६० टन घेऊन दुबईला पाठविल्याने मंदीच्या काळातही १ लाख ५३ हजार रुपये मिळाले आहेत. -जालिंदर भाऊसाहेब ढमढेरे,
प्रगतिशील शेतकरी, तळेगाव ढमढेरे