तळेगावच्या सोहमचा उपग्रह पोहचणार अंतराळात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:10 AM2021-01-21T04:10:51+5:302021-01-21T04:10:51+5:30
तळेगाव ढमढेरे येथील कुमार जयसिंगराव ढमढेरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ या शाळेत शिक्षण घेणारा सोहम पंडित ...
तळेगाव ढमढेरे येथील कुमार जयसिंगराव ढमढेरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ या शाळेत शिक्षण घेणारा सोहम पंडित याला उपग्रहांबाबतची नेहमीच उत्सुकता आहे. शाळेमध्ये देखील शिक्षकांना नेहमी तो उपग्रहांबाबत माहिती विचारीत असतो. तर नुकतेच स्पेस रिसर्च चालेंज २०२१ या उपक्रमांतर्गत १०० उपग्रह बनविण्याच्या अभिनव उपक्रम ७ फेब्रुवारी २०२१ रोजी होणार असून याद्वारे २५ ते ८० ग्रम वजनाचे १०० उपग्रह बनवून त्या उपग्रहांना ३५ ते ३८ हजार मीटर उंचीवर हेलियम बलूनच्या साहाय्याने पृथ्वीच्या समकक्षेत अवकाशात प्रस्थापित केले जाणार आहे. सदर उपग्रह निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्रातून ३५४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये शिरूर तालुक्यातून सोहन पंडितची निवड झाली आहे. तर निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपग्रह बनविण्याच्या संदर्भातील ऑनलाईन प्रशिक्षण जानेवारीमध्ये झाले असून प्रत्यक्ष उपग्रह बनविण्याची चाचणी देखील नुकतीच पार पडली आहे. या उपक्रमात महाराष्ट्राचे नेतृत्व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे रामेश्वरमचे महाराष्ट्र समन्वयक मनीषा चौधरी, सचिव मिलिंद चौधरी हे करत आहेत. तर सोहम पंडित याला सदर उपक्रमात सहभाग घेण्यासाठी वर्गशिक्षिका माधुरी शेजवळ, आई रेश्मा पंडित, वडील सागर पंडित यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे. तर सोहम पंडितचे उपग्रह अंतराळात जाणार असल्याने शिरूर तालुक्यातून त्याचे कौतुक होत आहे. मुख्याध्यापिका साधना वाघोले, शालेय समितीचे अध्यक्ष जालिंदर आदक यांनी त्याचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहे. तळेगाव ढमढेरे येथील अंतराळात उपग्रह सोडण्यास निवड झालेला सोहम पंडित व त्याचे शिक्षक आणि पालक.