‘कुजबुज’साठी किस्से

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:09 AM2021-06-27T04:09:28+5:302021-06-27T04:09:28+5:30

राष्ट्रवादी कॉंग्रेस सलग पंधरा वर्षे राज्याच्या आणि दहा वर्षे देशाच्या सत्तेत होती. मात्र या कालावधीत या पक्षाला प्रशस्त कार्यालय ...

Tales for ‘whispers’ | ‘कुजबुज’साठी किस्से

‘कुजबुज’साठी किस्से

Next

राष्ट्रवादी कॉंग्रेस सलग पंधरा वर्षे राज्याच्या आणि दहा वर्षे देशाच्या सत्तेत होती. मात्र या कालावधीत या पक्षाला प्रशस्त कार्यालय शहरात उभे करता आले नव्हते. माजी महापौर आणि नगरसेवक प्रशांत जगताप यांनी मात्र शहराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच पक्षासाठी भव्य कार्यालयाची तजवीज अल्पावधीत केली. या धडाक्यामुळे जगताप यांनी थोरल्या आणि धाकट्या अशा दोन्ही पवारांची मने जिंकली असल्याचे सांगितले जात आहे. शरद पवार यांनी वेळात वेळ काढून या कार्यालयाला भेट दिली. यापूर्वीच्या शहराध्यक्षांना जे जमले नाही ते जगताप यांनी एकहाती करुन दाखवले. मात्र पक्षाच्या जेष्ठ नेत्यांनी जगताप यांचे तोंड भरून कौतूक केल्यामुळे जुन्या पदाधिकाऱ्यांचा मात्र जळफळाट झाला आहे. त्यामुळे या नव्या कार्यालयाच्या उभारणीसाठी कोणी, काय योगदान दिले याचे खरे-खोटे किस्से तिखट-मीठ लावून सांगण्याची स्पर्धाच आता सुरु झाल्याचे ‘राष्ट्रवादी’चे कार्यकर्ते सांगत आहेत. प्रशांत जगताप मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन पुढच्या कामाला लागले आहेत. अर्थातच ते म्हणजे हे सध्या भाडेतत्त्वावर असणारे हे कार्यालय पक्षाच्या ‘नावावर’ कसे करुन घ्यायचे.

--------

‘पंकजाताईं’मुळे उत्साह

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचे मोहोळ पुण्यात आहे. तरीही या गटाला ताकद देण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे यांच्याकडून आजवर फारसा झालेला नाही. पुण्यातल्या पक्षीय कार्यक्रमांमध्ये देखील त्यांचा फारसा सहभाग दिसलेला नाही. या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षण आंदोलनाचे नेतृत्त्व करण्यासाठी पंकजा मुंडे मोठ्या कालखंडानंतर पुण्यात आल्या. त्यांच्या उपस्थितीमुळे बऱ्याच कालावधीनंतर शहर भाजपामध्ये उत्साह निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. वास्तविक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कोथरुड मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र कोथरुडकरांना आपलेसे करण्यातच त्यांचा एवढा वेळ चालला आहे की शहरात अन्यत्र लक्ष देण्यास फार वेळ उरत नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुणे भाजपामध्ये जान ओतण्यासाठी पंकजाताईंनी वारंवार पुण्यात यावे अशी चर्चा भाजपा कार्यकर्ते करत होते.

---------------

पालिका आयुक्त माजी मुख्यमंत्र्यांच्या दारी

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने महापालिका वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आंबील ओढ्यातील अतिक्रमणाच्या कारवाईसंदर्भात ही भेट होती की अन्य कारणासाठी यावरुन तर्कवितर्क लढवले जात आहेत. आंबील ओढ्यातील अतिक्रमणे काढण्यासाठी महापालिकेने पुरेसा अवधी दिला. त्यानंतरही मुठभरांचा विरोध या कारवाईस होतो आहे. मात्र या कारवाईला आता बिल्डर-राजकारण्यांचे साटेलोटे असल्याचा संदर्भ जोडला गेल्याने संशय निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनुभवी सनदी अधिकारी असणारे विक्रम कुमार अजितदादांच्या कानावर घातल्याखेरीज फडणवीसांच्या भेटीला जातील का? की अजितदादांनीच त्यांना फडणवीस यांच्या भेटीसाठी पाठवले याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

Web Title: Tales for ‘whispers’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.