"बदली धोरणाविषयी सरकारशी चर्चा करणार"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:41 AM2019-03-03T00:41:34+5:302019-03-03T00:41:36+5:30
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर सर्व संघटनांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल,’ असे आश्वासन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिले.
सासवड : ‘शिक्षकांचे बदलीचे धोरण संघटनेच्या पदाधिकारी यांच्या बरोबर चर्चा करून; तसेच वेतनाचे व जुनी पेन्शन योजना आदी प्रश्न लवकरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर सर्व संघटनांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल,’ असे आश्वासन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिले.
प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीन यावर्षी शिक्षण परिषदेचे आयोजन सासवड शहरात करण्यात आले होते. या वेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार बोलत होते. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप, शिक्षक नेते संभाजीराव थोरात, राज्याचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, उमेश पाटील, राजेंद्र जगताप, आदी उपस्थित होते. या शिक्षण परिषदेस राज्यातून बहुसंख्येने शिक्षक आले होते. शिक्षण परिषदेसाठी शासनाने राज्यातील शिक्षकांना ३ दिवसांची विशेष रजा मंजूर केली होती. प्राथमिक शिक्षणातील विविध मागण्यांवर या शिक्षण परिषदेत चर्चा करण्यात येऊन शिक्षकांचे न्याय्य व हक्कासाठी अधिक आक्रमकपणे लढण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. सासवडमधील पालखीतळाच्या भव्य मैदानावर ही शिक्षण परिषद संपन्न झाली. या वेळी राज्यमंत्री विजय शिवतारे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, संजय जगताप आदीन्ांी आपली मनोगते व्यक्त केली व शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मनोगतातून व्यक्त केले. शिक्षण परिषद यशस्वी होण्यासाठी राज्य अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, कार्याध्यक्ष अंबादास वाजे, कोषाध्यक्ष जनार्दन निवंगरे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे, जिल्हानेते राजेंद्र जगताप, गणेश लवांडे, धनंजय जगताप, प्रकाश जगताप, विजय वाघमारे आदींनी नियोजन केले.