बोलून तर बघा, प्रश्न सुटेल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:08 AM2021-07-23T04:08:11+5:302021-07-23T04:08:11+5:30
प्रमुख अतिथी म्हणून माझं काम मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करणे व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे हे होतं. ते मी छान ...
प्रमुख अतिथी म्हणून माझं काम मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करणे व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे हे होतं. ते मी छान गोष्टीरुपातून केलं. मुलं आणि शिक्षक दोघेही खूष झाले. कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांचा घोळका माझ्याभोवती जमा झाला. (हा माझा नेहमीचा अनुभव.) कारण मुलं तेव्हा खूप चार्ज झालेली असतात. त्यांच्या मनात खूप प्रश्न निर्माण झालेले असतात. त्याची त्यांना उत्तरं हवी असतात. सुमारे अर्धा तास हा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम उभ्या उभ्याच सुरु होता. शेवटी मुख्याध्यापिकांनी आम्हाला ऑफिसमध्ये चहा घेण्यासाठी आमंत्रित केलं. मी मुलांच्या गराड्यातून वाट काढत निघालो. तेवढ्यात एक नववीतील मुलगी माझ्याकडे आली आणि म्हणाली, सर मला तुमचा मोबाईल नंबर देता का?
मी तिला म्हणालो, का गं तुला काही विचारायचं आहे का?. ती म्हणाली, हो, पण मी नंतर फोनवर विचारलं तर चालेल का? मी तिला माझं कार्ड दिलं. आणि बेटा तुझं ना. काय? म्हणून विचारलं. कार्ड हातात घेत ती म्हणाली, अस्मिता. गोरीपान, छान वेणी घातलेली, पाणीदार डोळ्यांची. पण मला ती तिच्या वयापेक्षा जास्तच मॅच्युअर्ड वाटली आणि तिच्या डोळ्यात एक वेदनादेखील जाणवली. माझं कार्ड घेऊन ती मैत्रिणींच्या घोळक्यात मिसळली. मी मॅडमच्यासोबत ऑफिसमध्ये आलो. तिथे चहा घेत शाळेच्या अडचणी, शासनाचं असहकार्य, पालकांचे भले बुरे अनुभव यावर दहा पंधरा मिनिटे चर्चा झाली आणि मग मी निरोप घेतला. दैनंदिन व्यापात मी अस्मिताला विसरूनही गेलो. आणि मग एके दिवशी माझा मोबाईल वाजला. अननोन नंबर होता. मी फोन घेतला. पलीकडून आवाज आला.. हॅलो सर. नमस्कार. मी अस्मिता बोलतेय. त्या दिवशी तुम्ही आमच्या शाळेत आला होतात ना. मी तुमचं कार्ड घेतलं होतं बघा. हां. हां. बोल, अस्मिता बोल. सर. मला तुमची थोडीशी मदत हवी होती. हं, बोल ना. सर. माझे वडील हातगाड्यावर केळी विकतात. दिवसभरात दोन तीनशे रुपये मिळतात. हातगाडी भाड्याची आहे. त्याचे रोज शंभर रुपये द्यावे लागतात. त्यात वडील दारू पितात. माझी आई जवळच्याच गादी कारखान्यात कापूस स्वच्छ करायचं काम करते. तिला रोज दीडशे रुपये पगार मिळतो. पण कापसाच्या यंत्रापाशी बसून तिला दम्याचा त्रास व्हायला लागलाय. घरात मीच मोठी आहे. एक लहान बहीण आणि दोन लहान भाऊ आहेत. मला आईला मदत म्हणून काही काम मिळेल का? मी विचारलं, तुला काय करायला आवडतं? सर. मला चित्रकला आवडते. तुम्ही शाळेत आला होतात त्या दिवशी हॉलच्या दारात मीच रांगोळी काढली होती आणि मला मेंदीपण खूप छान काढता येते. मी म्हटलं, अस्मिता, हा फोन कोणाचा आहे? ती : सर. हा आमच्या क्लासटीचर मॅडमचा आहे. मी : ठीक आहे. मी तुझ्यासाठी काहीतरी काम शोधेन आणि या नंबरवर तुला आठवडाभरात निरोप देईन. तू मात्र अभ्यासाकडे लक्ष दे बरं. ती : थँक्यू सर. मी लगेच आस्माज मॅम या नावाने नंबर सेव्ह केला. आणि, विचारात पडलो की किती कठीण परिस्थितीतून या मुलीला जावं लागतंय. या अल्लड वयातपण ती किती मॅच्युअर्ड विचार करते. ती ज्या घरात रहाते, ज्या वस्तीत राहून ती मोठी होतेय ते पाहिलं तर हे तिच्याकडून हे अजिबात अपेक्षित नव्हतं. पण म्हणतात ना.. नेचर इज ग्रेट बॅलेन्सर. त्याने अशी गुणी मुलगी अशा बापाच्या पदरात टाकून बॅलन्सच साधला होता. काय बरं काम द्यावं या मुलीला? मी मार्ग शोधत होतो.
दोन चार दिवस गेले. माझा एक व्यापारी मित्र मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला घरी आला. मुलगा जळगावचा होता. त्यांचा तेथे कपड्याचा मोठा व्यापार होता. दहा दिवसांनी लग्न सोलापुरात होणार होतं. तीन दिवस लग्नाचा कार्यक्रम चालणार होता. मला अस्मिता आणि बाळासाहेबांचं वाक्य दोन्ही एकदम आठवले. बोलून तर बघा प्रश्न सुटेल! मी माझ्या मित्राला विचारलं, अरे श्रीनिवास मेहंदीचं काय केलंस? कोणाला सांगितलंस? तो म्हणाला, थांब ते डिपार्टमेंट बायकोकडे आहे, तिला विचारतो. ते ऐकून वहिनी म्हणाल्या, अहो भाऊजी आठ दिवस झाले सांगतेय तुमच्या मित्राला. बघू या, बघू या असंच म्हणतात. असेल कोणी तर सांगा तुमच्या ओळखीचं... मी लगेच अस्मिताच्या मॅडमना फोन लावला. अस्मिताशीपण बोललो. वहिनी आणि अस्मिताचे बोलणे करुन दिले. एका व्यक्तीला चारशे रुपये याप्रमाणे अस्मिताने पुढच्या आठ दिवसांत लग्नघरी जाऊन पन्नास साठ मुलींच्या, महिलांच्या हातावर सुंदर मेंदी काढली. काही लोकांनी खूष होऊन जास्तीचे पैसे दिले. अस्मिताने तीसेक हजार रुपये आठ दिवसांत मिळवले. या आठ दिवसांत ती मला रोज रिपोर्टिंग करत होती. मी तिला प्रोत्साहन देत राहिलो. लग्न पार पडलं. आणि मग महिनाभराने अस्मिताचा फोन आला. ती खूप आनंदात होती. सांगत होती...
सर, तुम्हाला खूप खूप थँक्स. तुम्ही मेंदी काढायचं काम मिळवून दिलं. त्याचे तीस हजार मिळाले. त्यातून बाबांसाठी पाच हजारांचा नवा हातगाडा तयार करून घेतला. आईला दवाखान्यात नेऊन आणले व एक शिलाई मशीन घेऊन दिली. घराला जुन्या बाजारातून पत्रे घेतले, ते घातले. आता पावसाळ्यात आमचं घर गळणार नाही. आणि, उरलेल्या पैशातून आणखी दोन हातगाड्या तयार करून घेतल्या. त्या मी रोज प्रत्येकी शंभर रुपयेप्रमाणे भाड्याने देतेय. हे भाडं मी स्वतः घेते. यातून आमच्या सगळ्यांच्या शिक्षणाचा खर्च भागेल. मी आता सुट्टीत कॉम्प्युटर क्लास लावणार आहे. कारण तुम्ही सांगितलेल्या काकांना माझा स्वभाव खूप आवडला. मला अठरा वर्षे पूर्ण झाली की त्यांच्या सुपर मार्केटमध्ये नोकरी देईन म्हणून सांगितलंय त्यांनी. सर हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. आता माझ्या घरातलं वातावरण खूप बदललंय. बाबा आता दारू पीत नाहीत. आम्हा सगळ्यांशी प्रेमाने बोलतात, काळजी घेतात. सर, माझे आई-बाबा तुम्हाला एकदा भेटायचं म्हणतात. ते म्हणतात, देव आम्हालाही पाहायचा आहे, कधी भेटाल सर?
मी स्तब्ध, निःशब्द! सहज म्हणून मी श्रीनिवासकडे मेंदीचा विषय काढला काय, आणि या पोरीने तर पुढे चमत्कारच करुन दाखवला. अक्षरशः चमत्कार!
मी म्हटलं, अस्मिता.. बेटा कधीही ये. फक्त फोन करून ये. आणि मी देव वगैरे नाही, एक सर्वसामान्य माणूस आहे, तुझ्यासारखाच. मी विशेष असं काहीच केलं नाही. तू बोललीस, तू प्रयत्न केलास म्हणून हे सारं शक्य झालं. तू माझ्याकडे बोललीस.. मी पुढे बोललो. म्हणूनच वाटतं एकदा बोलून तर बघा, प्रश्न सुटेल.