इंदापूर तालुक्यात लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीचीच चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 12:03 AM2019-02-08T00:03:01+5:302019-02-08T00:04:35+5:30
इंदापूर तालुक्यात लोकसभेपेक्षा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचीच चर्चा जास्त होत आहे. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा घेऊन निवडणुकीचा बिगूल वाजवला आहे.
- सतीश सांगळे
इंदापूर तालुक्यात लोकसभेपेक्षा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचीच चर्चा जास्त होत आहे. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा घेऊन निवडणुकीचा बिगूल वाजवला आहे. तसेच, काँग्रेसनेही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत तालुक्यात युवक मेळावा आयोजित करण्याची व्यूहरचना केली आहे. त्यामुळे आगामी काळात इंदापूर तालुक्यात राजकीय रणधुमाळी पाहायला मिळेल.
राष्ट्रवादीचे दत्तात्रेय भरणे हे इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही जागा दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी नाही झाली तरी चालेल; पण राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूरची जागा कदापि सोडणार नसल्याची भूमिका कायम ठेवली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही इंदापूरमधून काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांची आघाडी होण्याचे संकेत दोन्ही पक्षप्रमुखांनी दिले आहेत. मात्र, राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीमध्ये इंदापूर तालुक्यातील जागेवरून कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच तुल्यबळ पक्ष आहेत. भाजपा व शिवसेना महायुतीची भूमिका स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या भोवताली राजकारण फिरत आहे. आघाडीच्या जागावाटपात ही जागा कोणालाही गेली, तरी तालुक्यात घमासान पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून आगामी निवडणुकीसाठी आमदार दत्तात्रय भरणे यांचा प्रबळ दावा आहे. विरोधी पक्षाचा आमदार असतानाही तालुक्यात विकासाची अनेक कामे केली आहेत. तसेच तालुक्यातील संपूर्ण नाडी माहिती असणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. याचबरोबरच तालुका बाजार समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब जगदाळे यांनी निवडणूक लढिवण्याचे जाहीर केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उमेदवारी देताना पक्षश्रेष्ठींचा कस लागणार आहे. तसेच, उमेदवारी जाहीर करताना अंतर्गत नाराजी टाळ्णाची कसरत साधावी लागणार आहे. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला राहिल्यास आमदार भरणे यांना उमेदवारी डावलूनदेखील चालणार नाही.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भरणे यांच्या कामाचे कौतुक केले आहे. तालुक्यातील जातीय समीकरणे भरणे यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत. मात्र, राष्ट्रवादीला संघटितपणे निवडणुकीला सामोरे जावे लागेल.
तालुक्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व पक्षाचे नेते अजित पवार यांच्या मागील आठवड्यात बाजार समिती प्रदर्शनाच्या माध्यमातून जाहीर सभा घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. तसेच, अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीदेखील पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्ली येथे भेट घेतली. तसेच, तालुक्यात पश्चिम महाराष्ट्र युवक मेळावा आयोजित करण्याचे सूतोवाच त्यांनी केले असून व पक्षाचे अध्यक्ष गांधी यांना उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. माजी मंत्री पाटील हे काँग्रेसचे वजनदार उमेदवार आहेत. त्यांनी १९ वर्षे मंत्रिमंडळामध्ये काम केले आहे. तसेच, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चांगले संबंध आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबरही त्यांचे चांगले संबंध राहिले आहेत. यामुळे इंदापूरच्या जागेवर काँग्रेसचा हक्क असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे इंदापूरच्या जागेवरून दोन्ही पक्षांत आतापासूनच संघर्ष सुरू झाला आहे.
इंदापूर विधानसभा मतदारसंघात जागावाटपात आघाडीकडून जागा कोणालाही गेली, तरी हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रेय भरणे यांच्यात तुल्यबळ लढत अटळ आहे. आघाडीचा उमेदवार विरुद्ध अपक्ष, अशी लढत होण्याची शक्यता आहे. दोघांपैकी एकाची ऐन वेळी अपनेक्षितपणे दुसऱ्या पक्षातून निवडणुकीची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटी प्रेमात आणि राजकारणात सारेकाही क्षम्य असते.