बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत; प्रशांत जगताप यांनी उडवली मनसेची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 03:32 PM2023-02-15T15:32:56+5:302023-02-15T16:08:54+5:30

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देताय

Talkative parrots dance to the beat of ED Prashant Jagtap ridiculed MNS | बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत; प्रशांत जगताप यांनी उडवली मनसेची खिल्ली

बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत; प्रशांत जगताप यांनी उडवली मनसेची खिल्ली

Next

पुणे : कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर झाल्यावर भाजप निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु महाविकास आघाडीने माघार घेतली नाही. राज ठाकरेंनी सुद्धा पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा पत्राद्वारे व्यक्त केली होती. परंतु आघाडी निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले. अशातच मनसे कोणाला साथ देणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. अखेर पोटनिवडणूकीत बाजूलाच राहिलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अखेर आपले पारडे भाजपच्या बाजूने झुकवले. हा पाठिंबा भाजपला असल्याचे मनसे नेते बाबू वागसकर यांनी सांगितले. यावरून राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मनसेची खिल्ली उडवली आहे. बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत. असं ट्विट त्यांनी केले आहे. 

जगताप म्हणाले, कोथरूड मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देताय. बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत. अशी खिल्ली त्यांनी उडवली आहे. साहेब किती दिवस तुम्ही दुसऱ्यांच्या वरातीत सुपारी घेऊन नाचणार? कधीतरी तुम्हीही घोड्यावर बसा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे. 

 हिंदुत्वाची भूमिकाच भाजपचीही भूमिका असल्याने भाजपला पाठिंबा

आमचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी होणार नाहीत, मात्र आमची हिंदुत्वाची भूमिकाच भाजपचीही भूमिका असल्याने भाजपला पाठिंबा जाहीर करत असल्याचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले आहे असे वागसकर म्हणाले आहेत. भाजपचे नेते राज ठाकरे यांची वारंवार भेट घेत असतात. या निवडणुकीसाठी स्थानिक नेतेही मनसेला गळ घालत होते. त्यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे मंगळवारी भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ व माजी महापौर मुरलीधर मोहोळ मनसेच्या शहर कार्यालयात आले. त्यावेळी त्यांना या निवडणूकीसाठी मनसे भाजपबरोबर असल्याचे त्यांना सांगितले अशी माहिती वागसकर यांनी दिली.

पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात 

महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांच नुकतंच दुःखद निधन झालं. ह्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिडणूका होत आहेत.  मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेंव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत  उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात अशी इच्छा राज ठाकरेंनी व्यक्त केली होती.  

Web Title: Talkative parrots dance to the beat of ED Prashant Jagtap ridiculed MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.