मुलांची भांडणे सुरू असताना मोबाईलवर बोलणे दुकानदाराला पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:11 AM2021-07-07T04:11:56+5:302021-07-07T04:11:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मुलांची भांडणे सुरू असताना मोबाईलवर बोलणे एका किराणा दुकानदाराला चांगलेच महागात पडले. दुकानदार गि-हाईकाशी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मुलांची भांडणे सुरू असताना मोबाईलवर बोलणे एका किराणा दुकानदाराला चांगलेच महागात पडले. दुकानदार गि-हाईकाशी बोलत असताना तो पोलिसांना फोन करीत असल्याचे वाटून भांडणा-या मुलांनी दुकानदारावर कोयत्याने वार करून गळा दाबून खुनाचा प्रयत्न केला. ही घटना कात्रजमधील संतोषनगर येथे ३ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता घडली.
याप्रकरणी दत्ता नथू जाधव (वय ४४, रा. कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जाधव यांचे संतोषनगरमध्ये लक्ष्मी किराणा स्टोअर्स दुकान आहे. त्यांच्या दुकानासमोर काही मुले भांडत होती. त्यावेळी ते मोबाईलवर गि-हाईकाशी बोलत होते. आरोपींना वाटले की आपल्या भांडणाची माहिती ते मोबाईलवरून पोलिसांना देत आहे. त्यांचे काहीएक न ऐकता काची नावाच्या मुलाने कोयत्याने त्यांच्या डोक्यात वार केला. त्यांनी हात आडवा केला असता तो कोयता त्यांच्या हातावर बसला. इतर तिघांनी जाधव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. काची याने त्यांचा गळा दाबून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला.