नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी चर्चा करून सांगते! अमृता फडणवीसांचं 'त्या' प्रश्नावर मजेशीर उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 04:03 PM2021-08-05T16:03:04+5:302021-08-05T16:23:40+5:30
महाविकास आघाडी सरकारची आवडणारी गोष्ट कोणती? अमृता फडणवीस म्हणाल्या...
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बंद दरवाजा आड झालेली भेट असो की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात झालेली बैठक यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. या भेटीवर भाजपसह इतर आघाडी सरकारमधील वरिष्ठ नेतेमंडळींनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण याचवेळी पुण्यात एका कार्यक्रमात अमृता फडणवीसांनी युतीवर सूचक वक्तव्य केले आहे.
अमृता फडणवीस या एका कार्यक्रमासाठी पुण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. फडणवीस म्हणाल्या, राज्यातील महाविकास आघाडी सरकार कमकुवत आहे. आणि हे सरकार कधी पडेल याचा काही नेम नाही. हे सरकार पडावं असा ध्यास प्रत्येकाला लागला आहे. पण ज्यावेळी हे सरकार पडेल त्यावेळी भाजपा चांगला पर्याय देईल.
यासंदर्भात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी चर्चा करून तुम्हाला निश्चित सांगेल...
दिल्लीमध्ये ज्या काही वरिष्ठ नेतेमंडळींमध्ये बैठका आणि भेटीगाठी होत आहे. त्या आजच होत नसून यापूर्वीपासून ते भेटत आले आहे. अचानक भेटले नाहीत. त्यावरून लगेच निष्कर्ष काढणे आणि त्यावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार आहे. तसेच ‘भाजपा चांगला पर्याय देऊ शकते असे ज्यावेळी म्हणता त्यावेळी भाजपा नेमकं कुणाला सोबत जाणार या प्रश्नावर फडणवीस यांनी या संदर्भात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी चर्चा करून तुम्हाला निश्चित सांगेल अशा शब्दात उत्तर दिले.
महाविकास आघाडी सरकारची आवडणारी गोष्ट कोणती? अमृता फडणवीस म्हणाल्या...
अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने टीका केली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्या नेहमीच महाविकास आघाडी सरकारवर टीका करतात. पूरग्रस्तांसाठी दिलेल्या पॅकेजसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावरुनही त्यांनी, या पॅकेजमध्ये महावसुली नाही झाली तर बरं, असे म्हणत पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. अमृता यांच्या या उत्तरानंतर महाविकास आघाडी सरकारमधील कोणती गोष्ट किंवा काम तुम्हाला आवडलं? असा प्रश्न पत्रकाराने विचारला होता. त्यावरही, त्यांनी चांगलाच टोला लगावला. महाविकास आघाडी सरकारमधील हे तिन्ही पक्ष एकत्रपणे एकमेकांची पाठ ज्या पद्धतीने खाजवतात ते मला खूप आवडतं, असे अमृत यांनी म्हटले.