टोलनाक्यावर आता घंटानाद!
By admin | Published: February 25, 2015 11:27 PM2015-02-25T23:27:28+5:302015-02-25T23:27:28+5:30
येथील आंदोलकांनी आजपासून ‘टोल चालू - घंटा चालू’ नावाने अनोखे आंदोलन सुरू केले आहे. येथील टोल बंद होईपर्यंत आंदोलक टोल नाक्यावर
शिक्रापूर : येथील आंदोलकांनी आजपासून ‘टोल चालू - घंटा चालू’ नावाने अनोखे आंदोलन सुरू केले आहे. येथील टोल बंद होईपर्यंत आंदोलक टोल नाक्यावर घंटानाद करणार आहेत. दरम्यान, आंदोलकांनी मंगळवारी केलेल्या वाहनगणतीत १० हजार १० वाहनांची मोजदाद झाली. २४ तासांत टोल उद्योजकाने सव्वाचार लाख रुपये वसूल केल्याची माहिती आंदोलकांनी आज सार्वजनिक बांधकाम खात्याला सादर केली.
येथील टोल नाक्यावरुन टोल भरणाऱ्या वाहनांची चुकीची संख्या सांगितली जात होती. यासाठी आंदोलकांनी मंगळवारी पहिल्याच दिवशी २४ तासांची वाहन गणती करून त्याचा अहवाल आज सार्वजनिक बांधकाम खात्याला सादर केला. वाहनगणती केलेल्या वाहनांची संख्या पुढीलप्रमाणे-
कार व छोट्या घरगुती गाड्या ४७८२, बस, टेम्पो, व्यावसायिक वाहने २७३६ व ट्रेलर तसेच अवजड वाहने २४९२ . या सर्व २४ तासांतील १० हजार १० वाहनांकडून मंगळवार सकाळी ८ ते बुधवार सकाळी ८ पर्यंत एकूण ४ लाख २३ हजार ७३० रुपये वसूल केल्याची घोषणा ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर यांनी केली. दरम्यान, बुधवारपासून आंदोलकांच्या वतीने टोल नाक्यावर मोठा घंटा लावण्यात आल्या आहेत. शिक्रापूर टोल नाका बंद होईपर्यंत त्या चालू ठेवण्याचा निश्चय आंदोलकांनी आज केला. हा घंटा कार्यकर्ते प्रत्येक तासाची पाळी लावून दिवस-रात्र वाजवत असल्याची माहिती अंकुश घारे यांनी केली.