तळमाचीवाडी पुनर्वसन योजना आजही अर्धवट
By Admin | Published: July 5, 2017 02:34 AM2017-07-05T02:34:57+5:302017-07-05T02:34:57+5:30
डोंगरउतारावरील माती पावसाच्या पाण्याने वाहून येऊन झालेल्या माळीणसारख्या दुर्घटनेच्या सावटातच जुन्नर तालुक्यातील आदिवासी
नितीन ससाणे/ लोकमत न्यूज नेटवर्क
जुन्नर : डोंगरउतारावरील माती पावसाच्या पाण्याने वाहून येऊन झालेल्या माळीणसारख्या दुर्घटनेच्या सावटातच जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील तळमाचीवाडी गावातील ग्रामस्थ सन २००५ पासून जीव मुठीत धरून राहात आहेत. गावाला तसेच ग्रामस्थांच्या जिवाला धोका असल्याने राज्य शासनाने या गावासाठी पुनर्वसन योजना राबविली परंतु अद्यापही निकृष्ट दर्जाचे बांधकाम, शासनाचे दुर्लक्ष यामुळे पुनर्वसनाचे काम अर्धवट आहे. ग्रामस्थ घाबरूनच येथे राहात आहेत.
४जुन्नरपासून २५ किमी अंतरावरील निमगिरी गावालगतच्या डोंगरावर तळमाचीवाडी हे गाव वसलेले आहे. जेमतेम ५०० लोकवस्ती आहे.
४पावसाळ्यात येथील ग्रामस्थ जीव मुठीत धरून राहातात. कारण भूस्खलनाची भीती त्यांना नेहमीच सतावत असते. सन २००५ साली डोंगराच्या पायथ्याशी ५ फूट खोल, ३ मीटर रुंद तर ५ किमी लांबीची भेग जमिनीला पडली होती.
४शासनाने भूवैज्ञानिकांचे पथक पाठवून पाहाणी करून अहवाल तयार करण्यास सांगितले होते. या पथकाने दोन आठवडे अभ्यास करून या गावाला भूस्खलनाचा धोका असून गावाचे पुनर्वसन करण्याचा अहवाल सादर केला.
४राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने सुरक्षित ठिकाणी १०० घरे बांधून देण्याचे काम सुरू केले होते. परंतु निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले व ते देखील अर्धवटच़
९ फेब्रुवारी २०१५ रोजी शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाबरोबर तळमाचीवाडीच्या पुनर्वसनासाठी झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी यांनी तहसीलदारांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्यासाठी सूचना केल्या होत्या. परंतु याबाबत केवळ कागदी घोडे नाचविण्यापलीकडे काहीही झाले नाही. पुनर्वसनाच्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी लोकसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. परंतु शासनाने वा लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांच्या या मागणीची जराही दखल घेतली नाही. शासनाच्या दिरंगाईने पुनर्वसनाचे घोंगडे इतकी वर्षे भिजतच पडले आहे.