Pune gangster Gajanan Marne Released From Taloja Jail : गजानन मारणे याची तळोजो कारागृहातून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:14 AM2021-02-16T04:14:26+5:302021-02-16T04:14:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कुख्यात गजानन मारणे याची २ खुनाच्या खटल्यांतून मुक्तता केल्यानंतर त्याच्यावर आणखी खटले नसल्याने सोमवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कुख्यात गजानन मारणे याची २ खुनाच्या खटल्यांतून मुक्तता केल्यानंतर त्याच्यावर आणखी खटले नसल्याने सोमवारी सायंकाळी मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. त्याचे स्वागत करण्यासाठी कारागृहाबाहेर त्याचे हजारो समर्थक उपस्थित होते. त्यांनी महाराष्ट्राचा किंग असे स्टेटस टाकत त्यांची एक्सप्रेस हायवेवरुन जंगी मिरवणूक काढली. त्यात ५०० हून अधिक चारचाकी गाड्या सहभागी होत्या.
पप्पू गावडे आणि अमोल बधे या खून प्रकरणात २०१४ मध्ये गजानन मारणे व त्याच्या समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. तेव्हापासून मारणे हा तुरुंगात होता. सुरुवातीला येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याला कोल्हापूरला हलविले. सध्या तळोजा कारागृहात ठेवण्यात आले हाेते.
गजानन मारणे हा सोमवारी सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी कारागृहाबाहेर आला. यावेळी कारागृहाबाहेर मोठा जमाव जमला होता. त्यानंतर त्याच्या सर्व गाड्या एकामागोमाग एक्सप्रेस हायवेने पुण्याकडे रवाना झाला.
विना टोल प्रवेश
एरवी टोलनाक्यावरील कर्मचारी एकाही वाहनांना सोडत नाही. मात्र, गजानन मारणे याच्या पुढे मागे शेकडो कार होत्या. त्या सर्व गाड्यांचे दोन्ही नाक्यांवर टोल न भरताच वेगाने पुढे रवाना झाल्या. उर्से टोलनाक्यापर्यंत ही मिरवणुक सुरु होती. त्यानंतर समर्थकांच्या गाड्या वेगवेगळ्या मार्गाने रवाना झाल्या. कोथरुडमधील पौड रोड येथील घरी रात्री दोन -तीन गाड्यांसह गजानन मारणे घरी पोहचला.
गेल्या महिन्यात शरद मोहोळ तुरुंगातून बाहेर आला असून इतरही काही गुंड सध्या बाहेर आले आहेत. त्यामुळे पुण्यात पुन्हा टोळीमध्ये वर्चस्वाचा संघर्ष सुरु होतो की काय याविषयी चर्चा सुरु झाली आहे.