जिल्ह्याएवढा तालुका, पण कारभार जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:16 AM2021-02-06T04:16:21+5:302021-02-06T04:16:21+5:30
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याचे कार्यक्षेत्र एखाद्या जिल्ह्यापेक्षा कमी नाही. लोकसंख्या थेट चाळीस लाखांच्या घरात. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सुमारे ...
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याचे कार्यक्षेत्र एखाद्या जिल्ह्यापेक्षा कमी नाही. लोकसंख्या थेट चाळीस लाखांच्या घरात. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सुमारे दीडशे नगरसेवक, जिल्हा परिषद-पंचायत समितीचे ३० सदस्य आणि अकरा आमदारांसाठी हा तालुका महत्त्वाचा आहे. या जबाबदार लोकप्रतिनिधींच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आणि जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचे आव्हान महसूल यंत्रणेपुढे असते. त्यामुळेच या तालुक्याच्या महसूल विभागाची जबाबदारी सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरतच असते. हवेली प्रांत अधिकारी सचिन बारवकर हे आव्हान सर्व सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मदतीने पार पाडताना दिसतात.
पूराचे संकट येवो, कोरोनाची महामारी असो की निवडणुकांचा हंगाम तलाठी, सर्कल अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार आणि अन्य महसूल कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून सर्व कामे फत्ते केली जातात. बारवकर यांच्यावर एखादी जबाबदारी सोपवली म्हणजे ती पूर्ण झालीच म्हणून समजा. जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण असल्याने येणारे मंत्री, सरकारी शिष्टमंडळे, न्यायालयीन समित्या आदी सर्व राजशिष्टाचार सांभाळत सर्व महसुली कामे, सुनावण्या, दाखले वाटप वेळेतच पूर्ण करण्यावर बारवकर यांचा भर असतो. यामुळेच कधी ‘पेडिंग फाईल्स’ त्यांच्या टेबलावर दिसत नाहीत.
--------------
‘फ्रंट लाईन’वर राहून कोरोनाशी मुकाबला
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि देशपातळीवर अथक प्रयत्न करण्यात येत आहेत. यात त्यासाठी अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार, औषध विक्रेते यांनी जोखीम पत्करून कामे केलीच, पण हवेली तालुक्यातील प्रांत अधिकाऱ्यांपासून, सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्व तलाठी व सर्कल अधिकारी यांनी जीव धोक्यात घालून काम केले. कोरोना काळात महसूल विभागाची सर्व मंडळी आघाडीवर राहून दिवसरात्र काम करत होती. हवेली तालुका हा जिल्ह्यातील सर्वांत मोठा तालुका आहे. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न असूनही प्रत्येकाने राष्ट्रीय आपत्ती समजून जिवाची पर्वा न करता काम केले.
कोरोना संकटानंतर संपूर्ण देशात लाॅकडाऊन जाहीर झाला. लाखो मजूर, कामगार, स्थलांतरितांना आपापल्या मूळ प्रांतातल्या घरी सुखरूप पोहोचण्याची ओढ निर्माण झाली. अडचणी अनंत होत्या. त्यावेळी आवश्यक ती सर्व तयारी व मदत करण्याची मुख्य जबाबदारी महसूल यंत्रणेवर आली. पुण्यातल्या एकूण स्थलांतरित मजूर-कर्मचाऱ्यांपैकी निम्मे कामगार एकट्या हवेली तालुक्यातच वास्तव्य करून होते. या लाखो कष्टकऱ्यांची नोंद घेणे, त्यांना त्यांच्या-त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी वाहतूक व्यवस्था करणे, त्यांच्या जेवणखाणाची, औषध-निवाऱ्याची व्यवस्था करणे हे मोठे काम हवेली प्रांत अधिकारी सचिन बारावकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व तलाठी, सर्कल अधिकाऱ्यांनी केले. यासाठी किती अथक तास या सर्वांना काम करावे लागले याची कल्पनाच न केलेली बरी.
------
तलाठी, सर्कलने पदरमोड करून कामगारांना मदत केली
देशावर, राज्यावर एखादी आपत्ती आली की महसूल यंत्रणा किती झोकून देऊन काम करते हे कोरोनाच्या संकटकाळात पुन्हा एकदा स्पष्ट झाले. हवेली तालुक्यात स्थलांतरित झालेल्या परराज्यातील, परजिल्ह्यातील कामगार-मजुरांच्या निवास व भोजन व्यवस्थेस प्रसंगी शासकीय निधी कमी पडला. मात्र अशावेळी महसूल विभागाने मानवतेचे प्रदर्शन करत पदरमोड करुन तयार अन्नाचे, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा अखंडित चालू ठेवला.
---------------
शिक्षक, पदवीधर निवडणूक होती आव्हानात्मक
कोरोनानंतर राज्यात प्रथमच पदवीधर व शिक्षक मतदार संघाची सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीत प्रथमच यापूर्वीची मतदार यादी रद्द करून शंभर टक्के नव्याने मतदार यादी तयार करण्यात आली. यामुळेच मतदार नाव नोंदणी मोहिमेपासून, अर्ज भरून दिलेल्या पात्र लोकांची नावे मतदार यादीत आली किंवा नाही हे पाहावे लागले. जिल्ह्यातील सर्वाधिक शिक्षक व पदवीधर मतदार हवेली तालुक्यात असल्याने मतदान केंद्रांची संख्या वाढलेली असल्याने त्याचा ताण वेगळाच होता. अंतिम मतदार यादीतील चुका आणि दुबार नावे यामुळे मतदानाच्या दिवशी खूप गोंधळ होणार असे अनेकांना वाटू लागले. यामुळे सर्वच वरिष्ठ अधिकारी प्रचंड ताणाखाली होते. पण, विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांच्या नेतृत्वाखालील हवेली प्रांत अधिकारी सचिन बारावकर यांनी निवडणुकीचे नेटके नियोजन केले. बारवकर यांच्या ‘टीम’मधल्या तलाठी, सर्कल अधिकाऱ्यांनी खूपच गांभीर्याने काम केल्याने शिक्षक, पदवीधर निवडणुकीचे आव्हान सरकारी यंत्रणेने सहज पेलले.
--------
संगणकीकृत सात-बारा मोहिमेत आघाडी
हवेली तालुका जेवढा मोठा आहे तेवढाच येथील महसुली कामांचा व्याप देखील मोठा आहे. दररोज येणाऱ्या हजारो नोंदी, शेकडो अर्ज आणि विविध कामासांठी भेटणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय असते. या सर्व गोष्टी सुरू असताना शासनाच्या अन्य महसुली कामांना तेवढेच महत्त्व देण्याची कसरत प्रांत अधिकारी सचिन बारावकर यांना करावी लागते. त्यामुळे बारवकर यांच्या नेतृत्वाखाली हवेलीचे सर्व तलाठी, सर्कल कार्यालयीन निर्धारित कार्यालयीन वेळेशिवाय रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबून संगणकीकृत सातबारा व डिजिटल स्वाक्षरीत सातबारा, ई- फेरफार, फेरफार अदालत ही कामे करतात. यामुळे या सर्व महसूली कामांमध्येही तालुका आघाडीवर आहे.
---