Tasty Katta: चिंचेचे पाणी, बारीक चिरलेला कांदा, मुरमुरे, फरसाण 'ओली भेळ पाणीपुरी, रगडापुरी' अन् बरंच काही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 11:44 AM2022-12-12T11:44:43+5:302022-12-12T11:45:47+5:30

एकाएका पदार्थाचे नाव ऐकले तरी तोंडाला पाणी सुटते

Tamarind Water, Finely Chopped Onion, Crispy Murmures, Farsan 'Oli Bhel Panipuri, Ragdapuri' and many more | Tasty Katta: चिंचेचे पाणी, बारीक चिरलेला कांदा, मुरमुरे, फरसाण 'ओली भेळ पाणीपुरी, रगडापुरी' अन् बरंच काही

Tasty Katta: चिंचेचे पाणी, बारीक चिरलेला कांदा, मुरमुरे, फरसाण 'ओली भेळ पाणीपुरी, रगडापुरी' अन् बरंच काही

googlenewsNext

राजू इनामदार

पुणे : काही पदार्थ गाडीवर, गाडीवाल्याच्या शेजारी उभे राहूनच खायचे असतात. हॉटेलमध्ये खुर्ची-टेबलवर बसून खायला जाल तर त्यातली मजा जाईल. बंद दुकानांमधून विकणाऱ्यालाही त्यात चव आणता येणार नाही. भेळ, पाणीपुरी, रगडापुरी, रगडाकचोरी या सर्व पदार्थांचे असेच आहे. ते विकणाऱ्याच्या गाडीवर, त्याच्या शेजारी उभे राहूनच खायला हवेत. फार झाले तर त्याच्यापासून थोडे लांब; पण त्याच्यासमोरच थांबून.

अंतरंग

यातल्या एकाएका पदार्थाचे नाव ऐकले तरी तोंडाला पाणी सुटते. समोर दिसत असल्यावर काय सांगायचे. चिंचेचे पाणी, बारीक चिरलेला कांदा, त्यापेक्षाही बारीक चिरलेली कोथिंबिर, हिरव्या कैरीचेही तसेच बारीक काप, टोमॅटो, ठेचून ठेचून केलेला हिरव्या मिरचीचा थोडासा ओलसर असा गोळा, खारे शेंगदाणे, भावनगरी म्हणजे बारीक शेव. कुरकुरीत मुरमुरे, फरसाण व भावनगरी म्हणजे अगदी बारीक असलेली शेव व खास असा मसाला.

ओल्या भेळीचे तयार होणे

हे सगळे कसेही घेतले, कितीही घेतले व टाकले असे करून चालत नाही. कशावर काय टाकायचे, आधी काय टाकायचे, नंतर काय टाकायचे व सर्वांत शेवटी काय टाकायचे हेही ठरलेले आहे. प्रमाण चुकले की चवही चुकलीच समजायची. स्टिलच्या भांड्यात एकएक करत हे पदार्थ टाकल्यावर एका डावाने हे सगळे मिश्रण ढवळायचे. हे ढवळणे एखादा पदार्थ तुटणार नाही, पण त्याला चिंचेचे पाणी, हिरवी मिरची लागेल अशा नाजूकपणे करावे लागते. ही असते ओली भेळ. त्यावर भावनगरीची पखरण केली की खाण्यासाठी एकदम तयार.

ओल्या भेळीच्या गाडीवरचा परिवार

पाणीपुरीचे सुख काय सांगावे? एक छोटीशी पुरी तिच्यात शिजून पुरणासारखे झालेले चारदोन वाटाणे, चिंचेचे, हिरव्या मिरचीचे पाणी, भावनगरी पडली की किती चवदार होते ते सांगून समजणारच नाही. रगडापुरी, रगडाकचोरी, एसपीडीपी, हा सगळ्या ओल्या भेळीच्या गाडीवरचा परिवारच जिभेला परमसुख देणारा आहे. बांधून नेऊ, घरी जाऊन खाऊ, लांब तिकडे खुर्चीवर बसून खाऊ असे करून त्यातील मजा समजणार नाही. जवळपास संपत आलेली भेळ लगेच त्यावर थोडी शेव व चिंचेचे पाणी घेऊन पुन्हा चविष्ट करण्यात जी मजा आहे ती खाणाऱ्यालाच माहीत.

कुठे :- उद्यानाबाहेरच्या गाड्यांवर, त्यातही कमला नेहरू उद्यान, सारसबाग, राणा प्रताप उद्यान
कधी :-  शक्यतो दुपारी ४ पासून सायंकाळचा रंग उतरेपर्यंत

Web Title: Tamarind Water, Finely Chopped Onion, Crispy Murmures, Farsan 'Oli Bhel Panipuri, Ragdapuri' and many more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.