तानाजी झुंजूरके ‘मुळशीकेसरी’
By admin | Published: January 24, 2017 01:34 AM2017-01-24T01:34:53+5:302017-01-24T01:34:53+5:30
मुळशीकेसरी या कुस्ती स्पर्धेचे आयोजन पिरंगुट येथील घोटावडे फाटा येथे करण्यात आले होते. संपूर्ण मुळशी तालुक्यातील
पिरंगुट : मुळशीकेसरी या कुस्ती स्पर्धेचे आयोजन पिरंगुट येथील घोटावडे फाटा येथे करण्यात आले होते. संपूर्ण मुळशी तालुक्यातील कुस्तीशौकिनांचे लक्ष लागून राहिलेल्या या मुळशीकेसरी किताबाचा मानकरी तानाजी झुंजूरके ठरला.
या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील अनेक लहान-मोठ्या जवळपास ४०० मल्लांनी सहभाग घेतला होता. अनेक प्रेक्षणीय कुस्त्या प्रेक्षकांना पाहावयास मिळाल्या. मुळशीकेसरी किताबासाठी खुल्या गटातून एका बाजूने माजी उपमहाराष्ट्रकेसरी सचिन येलभर याच्याबरोबर झालेल्या उपांत्य फेरीच्या रोमहर्षक व अटीतटीच्या कुस्तीमध्ये ५-४ अशा गुणांच्या आधारे पराभव करून तानाजी झुंजूरके याने अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या बाजूने सोनबा काळे याने चेतन कंधारे याचा पराभव करून मुळशीकेसरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
मुळशीकेसरी या मानाच्या किताबासाठी झालेल्या प्रेक्षणीय कुस्तीमध्ये मूळचा मुळशीकर असलेला तानाजी झुंजूरके याने सोनबा काळे याचा ३-१ अशा गुणांच्या फरकाने पराभव करून या वर्षीच्या मुळशीकेसरी किताबावर आपले नाव कोरले. याबरोबर अनेक विविध वजनी गटांमध्ये अनेक कुस्त्या झाल्या.
त्यामध्ये ५७ किलो वजनी गटामध्ये प्रथम भालचंद्र कुंभार, द्वितीय सनी भागवत, तृतीय पोपट पालवे, ६१ किलो वजनी गटामध्ये प्रथम अनुधान चव्हाण, द्वितीय राजू हिप्परकर, तृतीय प्रतीक जगदाळे, ६५ किलो वजनी गटामध्ये प्रथम सागर लोखंडे, द्वितीय तुकाराम शितोळे, तृतीय अजिंक्य भिलारे ७० किलो वजनी
गटामध्ये प्रथम अनिल कचरे, द्वितीय अरुण खेंगले, तृतीय राकेश
मोझे, ७४ किलो वजनी गटामध्ये प्रथम रवींद्र करे, द्वितीय दिनेश मोकाशी व तृतीय आनंद मोहोळ यांनी आपापल्या वजनी गटामध्ये बाजी मारून नंबर मिळविला.
यावर्षी विविध क्षेत्रांतून दिला जाणारा मुळशीरत्न हा पुरस्कार या वर्षी प्रशासकीय क्षेत्रामधून संजयसिंह येनपुरे (पोलीस अधीक्षक नांदेड जिल्हा) यांना व कलाक्षेत्रातून प्रवीण तरडे (सिनेअभिनेते) यांना, राजकीय क्षेत्रातून मुरलीधर मोहोळ (नगरसेवक पुणे) यांना, तर संप्रदाय क्षेत्रातून हभप तुकाराम मानकर यांना देण्यात आला. या वेळी शंकर मांडेकर, चंद्रकांत मोकाटे, राजाभाऊ हगवणे, महादेव कोंढरे, सुरेश हुलावळे, किसन बुचडे, मोहन खोपडे, उपमहाराष्ट्रकेसरी अभिजित कटके उपस्थित होते.
स्पर्धेचे संयोजन मुळशीकेसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष - भास्कर मोहोळ, उपाध्यक्ष - बाळासाहेब आमले, कार्याध्यक्ष - सुनील चव्हाण, सचिव - शरद पवार, चिटणीस - पै. सचिन मोहोळ यांनी केले. (वार्ताहर)