Tanaji Sawant: शिंदे सरकारच्या मंत्र्यांची खातेवाटपासंदर्भात आज बैठक; तानाजी सावंत गैरहजर राहणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 03:12 PM2022-08-11T15:12:13+5:302022-08-11T15:28:07+5:30
Tanaji Sawant: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांनाही पहिल्याच टप्प्यात मंत्रीपदाची संधी देण्यात आली
पुणे - राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी पार पडला. त्यामध्ये, भाजपच्या 9 आणि शिंदे गटाच्या 9 अशा एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर, आता खाटेवाटपासंदर्भात आज महत्त्वाची बैठक होत आहे. तत्पूर्वी शिंदेगटाच्या आमदारांनी बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन दर्शन घेतले. मात्र, यावेळी मंत्री तानाजी सावंत दिसून आले नाहीत. आता, तानाजी सावंत हे प्रकृती अस्वस्थेमुळे या बैठकीलाही हजर राहणार नसल्याचे समजते. त्यांचा घसा खवखवत असल्याची सुत्रांची माहिती आहे.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांनाही पहिल्याच टप्प्यात मंत्रीपदाची संधी देण्यात आली. मात्र, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सातत्यांची ओढाताण झाल्याने त्यांची तब्येत बिघडली आहे. सावंत यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेत घरीच आराम करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिपदानंतर सोलापूर दौऱ्यावरुन ते पुण्यातील निवासस्थानी आले आहेत. दरम्यान, मुंबईत आज खातेवाटपाची बैठक होणार आहे. त्यामुळे, या बैठकीला सावंत उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे.