तानाजी सावंतांचा मुलगा विमानतळावरुन बेपत्ता; म्हणाले, "कमीत कमी १५ ते २० फोन..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 20:33 IST2025-02-10T19:55:15+5:302025-02-10T20:33:06+5:30
मुलगा बेपत्ता झाल्यानंतर तानाजी सावंत हे पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचले होते.

तानाजी सावंतांचा मुलगा विमानतळावरुन बेपत्ता; म्हणाले, "कमीत कमी १५ ते २० फोन..."
Tanaji Sawant Son Missing: माजी आरोग्य मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे विमातळावरुन बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपहरणाची तक्रार देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संध्याकाळी पाचच्या सुमारात तानाजी सावंत यांचे पुत्र ऋषिराज सावंत (Rushiraj Sawant) हे एका स्विफ्ट गाडीत बसून विमानतळावर गेले होते. त्यानंतर अचानक ऋषिराज सावंत हे बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली. या सगळ्या प्रकारानंतर तानाजी सावंत यांनी थेट पोलीस आयुक्तांचे कार्यालया गाठलं. यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.
शिवसेनेचे विद्यमान आमदार पुणे तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पुणे विमानतळावरून ते बेपत्ता झाले. सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नऱ्हे परिसरातून सायंकाळी ४.५७ वाजता स्विफ्ट गाडीतून ते पुणे विमातळावर गेले होते. त्यानंतर पुणे पोलिसांच्या कंट्रोल रुमलाही यासंदर्भात निनावी फोन आला. यानंतर तानाजी सावंत आणि सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली.
"दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या कंट्रोल रूमला माहिती मिळाली की तानाजी सावंत यांच्या मुलाला कोणीतरी घेऊन गेलेले आहे. ही माहिती मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आली. त्यांची माहिती घेणे सुरू झाले असून ते पुण्यावरून विमानाने गेले आहेत. त्यांचे विमान कोणत्या दिशेने आणि कुठे चालले आहे याची माहिती गोळा केली जात आहे. त्यांना परत आणण्यासाठी यंत्रणा काम करत आहे. याबद्दल सिंहगड रोड पोलीस ठाण्यात एक अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने क्राईम ब्रँचकडे या संदर्भातील तपास सोपवण्यात आला आहे. त्यांना परत सुखरूप आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत," अशी माहिती सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.
"मुलगा बेपत्ता किंवा त्याचे अपहरण झाले आहे असं काहीही नाही. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रच आहेत. माझ्या घरात आतापर्यंत अशी पद्धत नाही. अगदी जवळपास जाणार असेल तरी मुलगा मी इथे जात आहे असं सांगतो. पण यावेळी ते तिघेजण दुसऱ्याच गाडीतून गेल्याने मी अस्वस्थ झालो. याबाबत त्याने कोणालाही माहिती सांगितलेली नाही. दिवसातून कमीत कमी १५ ते २० फोन एकमेकांना होतात आणि त्यात फोन आलेला नाही. हा अचानक एअरपोर्टवर कशाला गेला त्यामुळे मी अस्वस्थ झालो. त्यानंतर मी पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून याची माहिती दिली. आता माहिती मिळत आहेत की ते विमानाने बाहेर गेले आहेत पण ते कुठे उतरणार आहेत याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. मुलाला जो ड्रायव्हर सोडायला गेला होता तो माघारी आला आणि त्याने माहिती दिली की मी त्या तिघांना एअरपोर्टला सोडून आलो. ते नेमके कुठे गेलेत हे काहीच माहिती नाही," असं तानाजी सावंत यांनी म्हटलं.