वढू बुद्रुक येथील तणाव निवळला, दोन्ही समाजाच्या एकत्रित बैठकीत निघाला तोडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 03:49 AM2018-01-01T03:49:38+5:302018-01-01T03:50:04+5:30
वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (दि. २९) नामफलकावरून उद्भवलेल्या वादातून गावामध्ये मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली असताना दोन्ही बाजूच्या ग्रामस्थांच्या बैठकीत सामोपचाराने तोडगा काढल्याने येथील तणाव निवळला आहे.
कोरेगाव भीमा : वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (दि. २९) नामफलकावरून उद्भवलेल्या वादातून गावामध्ये मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली असताना दोन्ही बाजूच्या ग्रामस्थांच्या बैठकीत सामोपचाराने तोडगा काढल्याने येथील तणाव निवळला आहे.
येथे लावण्यात आलेल्या नामफलकावरून गावामध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर काही जणांनी गोविंद गोपाळ यांच्या समाधीचे व नामफलकाचे नुकसान केल्याप्रकरणी ४९ जणांवर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करून सात जणांना अटकही करण्यात आली आहे, तर बेकायदा जमाव जमवून दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी नऊ जणांसह १५ जणांवर व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे यांच्या वाहनावर दगडफेक केल्याप्रकरणी सात जणांसह १५ ते २० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे गावामध्ये मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने गावात शिक्रापूर पोलिसांसह पुणे ग्रामीणचे पोलीस, राज्य राखीव दल, दंगल नियंत्रक पथकाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता. दरम्यान, या घटनेनंतर गावात दुकाने व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. पोलिसांनी सर्वांना सामाजिक शांततेचे आवाहन करण्यात आले होते.
आज पुन्हा सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात तोडगा काढण्याससाठी दोन्ही बाजूकडील पदाधिकारी व ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. या वेळी पंचायत समिती सदस्य व भीमा कोरेगाव विजयस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, घोडगंगाचे माजी संचालक अॅड. सुधीर ढमढेरे, माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, साहेबराव भंडारे, राजाराम आहेर, मारुती भंडारे, महादेव भंडारे, संजय भंडारे, पांडुरंग गायकवाड, विजय गायकवाड, संदीप गायकवाड, राजेंद्र गायकवाड, भाऊसाहेब भालेराव आदी उपस्थित होते.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत गोविंद गोपाळ यांच्या समाधीच्या ऐतिहासिक संदर्भाची शासकीय यंत्रणेकडून तपासणी करून नामफलक लावण्याचा व समाधीवर पूर्र्वीप्रमाणे छत उभारण्याचा सर्वमान्य निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे शुक्रवारी झालेल्या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी गैरसमजातून पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकीनंतर शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी दोन्ही समाजांना सामाजिक शांततेचे आवाहन केले. दरम्यान, गावामध्ये आजही पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, राजेंद्र कुंटे, अमर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त कायम होता. दरम्यान, दुपारी वढू बुद्रुक
येथे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी भेट देऊन समाधीस्थळाची पाहणी केली होती.
शांतता राखा!
वढू बुद्रुक येथे निर्माण झालेल्या वादावर ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन वाद मिटविल्याबद्दल दोन्ही समाजांतील ग्रामस्थांची भेट घेऊन सोशल मीडियावर वादग्रस्त मेसेजेस न टाकता सामाजिक शांतता राखण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी केले.
वढू बुद्रुक येथे झालेला सामाजिक वाद गावपातळीवरच मिटविण्यासाठी माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे व घोडगंगाचे संचालक सुधीर ढमढेरे यांनी मदत केल्याने मोठा वाद टळण्यास मदत होऊन गंभीर बनलेला गावातील वाद अखेर गावातच मिटला.
गोविंद गोपाळ यांच्या स्मारकास मदत करणार : रामदास आठवले
कोरेगाव भीमा : वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (दि. २९) नामफलकावरून उद्भवलेला वाद ग्रामस्थांनी गावातच मिटविल्याने सामाजिक सलोखा जपण्याचे काम केले आहे. गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या स्मारकास मी व खासदार अमर साबळे यांच्यासह राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या स्मारक व जीवनपटासंदर्भात लावलेल्या फलकावरून गावामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. गैरसमजातून दोन्ही समाजामध्ये वाढलेला तेढ दोन्ही समाजाच्या ग्रामस्थांनी गावपातळीवरच मिटविल्याने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांचे आभार मानले. या वेळी रामदास आठवले यांनी छत्रपती संभाजीमहाराज व गोविंद गायकवाड यांच्या समाधीस अभिवादन केले. या वेळी पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, स्थानिक पांडुरंग गायकवाड, संदीप गायकवाड, बाळासाहेब भालेराव यांच्यासह विविध संघटनांचे पदािधकारी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
रामदास आठवले यांनी सांगितले, ‘छत्रपती संभाजीमहाराज यांचा आम्हाला अभिमान असून त्यांच्याप्रमाणेच गोविंद गायकवाडांचाही आम्हाला अभिमान असल्याचे सांगत गोविंद गायकवाड यांच्या स्मारकासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून घ्या व स्मारक उभारणीसाठी मी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मदत करणार आहोत. खासदार अमर साबळे हेही या स्मारकासाठी मदत करणार असल्याचे सांगितले. तणाव मिटविण्यासाठी ग्रामस्थांसह पोलीस प्रशासनाने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगत गावात शांतता प्रस्थापित करण्याचे या वेळी ग्रामस्थांना आवाहन केले.