शहरातील धर्मादाय रुग्णालयांचा दोन दिवसांत अहवाल द्या : रुपाली चाकणकर
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: April 17, 2025 19:54 IST2025-04-17T19:53:29+5:302025-04-17T19:54:43+5:30
पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात एकुण ९५ तक्रारींवर महिला आयोगाची सुनावणी

शहरातील धर्मादाय रुग्णालयांचा दोन दिवसांत अहवाल द्या : रुपाली चाकणकर
पिंपरी : शहरातील धर्मादाय रूग्णालयांनी रूग्णालयासमोर माहितीचे फलक लावले आहेत की नाही. तसेच दोन दिवसात याबाबतचे अहवाल रूग्णालयानी व महापालिका प्रशासनाने द्यावेत, असे आदेश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत गुरुवारी (ता.१७) चिंचवडमधील ऑटो क्लस्टर येथे शहरातील महिल्यांच्या ९५ तक्रारींचा निपटारा करण्यात आला.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत महिला समस्यांबाबत पोलीस, महापालिका आणि विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी चाकणकर यांनी आदेश दिले. यावेळी पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त वियज खोराटे, उपायुक्त संदीप खोत, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप आदींसह महिला आयोगाच्या अधिकारी उपस्थित होते.
यावेळी महिला आयोगाच्या चाकणकर म्हणाल्या, शासकिय अथवा शिक्षण संस्थांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती असणे आवश्यक आहे. शहरातील महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या या समितीमार्फत सोडविल्या जातील. तसेच त्यांचा अहवाल महिला आयोगाकडे सादर करणे आवश्यक आहे. औद्योगिक शहर असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील महिला कंत्राटी कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी चाकणकर यांनी पुढाकार घेतला. मात्र याबाबतचा तपशील समोर नसल्याने त्यांनी सभेत जाब विचारला. यासह महापालिकेच्या विविध विभागाकडून सुरू केलेल्या योजनांसबंधी माहिती त्यांनी घेतली.
आयोगच आता महिलांच्या दारी : चाकणकर
चाकणकर म्हणाल्या, आयोगाचे मुख्यालय मुंबईत आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातल्या महिलांना आर्थिक, सामाजिक तसेच विविध कारणांमुळे मुंबईत येणे शक्य होत नाही. तेव्हा त्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी, मदत करण्यासाठी आयोगच सर्व यंत्रणाची जिल्हास्तरावर जात असतो. जनसुनावणीला माझ्या सह जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, विधी सेवा अधिकारी अशी विविध यंत्रणा उपस्थित राहत असल्याने महिलांना त्याच ठिकाणी मदत दिली जाते. तक्रारीमध्ये कौटुंबिक कलह, वादच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर आल्या. त्यानंतर कामाच्या ठिकाणी त्रास, आर्थिक फसवणूक अशा तक्रारी होत्या. महिला, पती तसेच कुटुंबाचे समुपदेशन करत तुटण्याच्या मार्गावर असलेले संसार पुन्हा जोडण्यावर आयोगाचा भर असतो. याव्यतिरिक्त महिलांना कायदेशीर सल्ला, पोलिसांची तातडीने मदत मिळवून देत आलेल्या महिलेला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येतो, असे त्यांनी सांगितले.