शहरात टँकरचा काळाबाजार सुरू, महापालिकेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 04:17 AM2018-04-05T04:17:56+5:302018-04-05T04:17:56+5:30
उन्हाळ्याच्या झळांमध्ये वाढ होऊ लागताच महापालिकेकडे पाण्याच्या टँकरच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. महापालिकेने नागरिकांची गरज भागवण्यासाठी स्वत:च्या टँकरबरोबरच काही खासगी संस्थांबरोबरही पाणी पुरवण्यासाठी करार केला आहे; मात्र त्यांच्यावर दरांचे बंधन असतानाही ते जादा दराने टँकर विकत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.
पुणे - उन्हाळ्याच्या झळांमध्ये वाढ होऊ लागताच महापालिकेकडे पाण्याच्या टँकरच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. महापालिकेने नागरिकांची गरज भागवण्यासाठी स्वत:च्या टँकरबरोबरच काही खासगी संस्थांबरोबरही पाणी पुरवण्यासाठी करार केला आहे; मात्र त्यांच्यावर दरांचे बंधन असतानाही ते जादा दराने टँकर विकत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.
शहराच्या मध्यभागात नसले, तरीही उपनगरांमध्ये मात्र फार मोठ्या प्रमाणावर टँकरने पाणी द्यावे
लागते. त्यातही वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, धानोरी,
टिंगरेनगर; तसेच धायरी, नºहे, आंबेगाव या भागात पाण्याची जास्त टंचाई आहे; तसेच हडपसरच्या काही भागातही टँकरची मागणी होऊ लागली आहे.
सध्या सर्व मिळून ३००पेक्षा जास्त टँकर लागत आहे. महापालिकेने ठरवून दिलेल्या खासगी टँकरचालकांकडून नागरिकांची अडवणूक करून जास्त पैसे घेतले जात आहे. एका टँकरला ७०० ते १००० रुपये मोजावे लागत आहेत़
टँकरमाफियांवर कारवाईची मागणी महापालिकेने काही वर्षांपूर्वी पाण्याच्या टँकरना जीपीएस यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला होता; तसेच खासगी टँकर्स व्यावसायिकांना त्यांनी जिथे टँकर दिला तेथील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आणणे बंधनकारक केले होते; मात्र त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे खासगी टँकरचालकांचे फावले आहे. बहुसंख्य टँकर पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातूनच टँकर भरून घेतात. तिथेही टँकरमाफिया तयार झाले असल्याची चर्चा आहे. प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.