टंचाई आराखड्याची मुदत संपल्याने बारामतीत टँकर बंद
By Admin | Published: August 10, 2016 01:40 AM2016-08-10T01:40:05+5:302016-08-10T01:40:05+5:30
तालुक्यातील जिरायती भागात अद्यापही पाणी टंचाईची समस्या गंभीर आहे. मात्र टंचाई आरखड्याची मुदत जुलै अखेर संपल्याने प्रशासनाने १३ टँकर कमी केले आहेत.
बारामती : तालुक्यातील जिरायती भागात अद्यापही पाणी टंचाईची समस्या गंभीर आहे. मात्र टंचाई आरखड्याची मुदत जुलै अखेर संपल्याने प्रशासनाने १३ टँकर कमी केले आहेत. तर टँकर बंद केल्याने पंचायत समितीचे सभापती यांनी प्रशासकिय अधिकाऱ्यांवर टिका करताना हा निर्णय दुर्दैवी असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
बारामती तालुक्यात सध्या २० टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. एकूण १६ गावे व १४६ वाड्यावस्त्यांवरील ४१ हजार ६७५ लोकसंख्येला ७० खेपांनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जिल्हाभर पडणाऱ्या पावसाने बारामती तालुक्याच्या जिरायती भागाकडे नेहमीप्रमाणे पाठ फिरवली आहे. या भागात एकही दमदार पाऊस झाला नाही. जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न अद्यापही गंभीर आहे. त्यात प्रशासनाने टंचाई आराखड्याच्या मुदतीचे कारण पुढे करीत टँकर बंद केल्याने या भागातील परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. जिरायती भागात बंद झालेले टँकर लवकर सुरू कारवेत अशीच आमची मागणी आहे. तालुक्यातील जराडवाडी, उंडवडी कडेपठार, साबळेवाडी, सोनवडीसुपे, शिर्सुफळ, बाबुर्डी, मोराळवाडी, तरडोली, मुर्टी, अंजनगाव, सायबाचीवाडी, काऱ्हाटी, काळखैरवाडी, देऊळगाव रसाळ, जळगाव सुपे, पानसरेवाडी, कारखेल, खराडेवाडी, कोळोली, उंडवडी सुपे, कुतवळवाडी, दंडवाडी, भोंडवेवाडी, नारोळी आदी गावांसह वाड्यावस्त्यांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे.