टँकरचालकांचा महापालिकेला ठेंगा; मोफत ब्लिचिंग पावडर केवळ एकानेच नेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 18:14 IST2025-02-01T18:13:26+5:302025-02-01T18:14:54+5:30

महापालिकेने नोटीसद्वारे टँकरचालकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला

Tanker drivers taunt the Municipal Corporation; Only one took free bleaching powder | टँकरचालकांचा महापालिकेला ठेंगा; मोफत ब्लिचिंग पावडर केवळ एकानेच नेली

टँकरचालकांचा महापालिकेला ठेंगा; मोफत ब्लिचिंग पावडर केवळ एकानेच नेली

- हिरा सरवदे

पुणे :
गुलियन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) बाधित क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व टँकरमध्ये ब्लिचिंग पावडर मिसळण्याचे आदेश देत महापालिकेने ही पावडर मोफत उपलब्ध करून दिली. मात्र, महापालिकेच्या या आदेशाला टँकरचालकांनी ठेंगा दाखवला आहे. महापालिकेकडून केवळ एका टँकरचालकानेच महापालिकेकडून पावडर नेली आहे. त्यामुळे महापालिकेने नोटीसद्वारे टँकरचालकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

धायरी, नांदोशी, किरकटवाडी, नांदेड या भागांसह काही गावांमध्ये जीबीएसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. या भागांतील विहीर आणि बोअरवेल अशा सोळा ठिकाणी टँकर व्यावसायिकांकडून पाणी भरले जाते. यातील बहुतेक व्यावसायिक हे स्थानिक भागातील असून, त्यांच्याकडूनच चांगले पाणी पुरवठ्याबाबत दुर्लक्ष केले जात आहे. जीबीएसच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सिंहगड रस्त्यावरील धायरी, नांदेड परिसरातील १५ टँकर पॉइंट चालकांच्या जलस्रोतांमधील पाण्याचे नमुने चाचणीसाठी घेतले होते. यापैकी एका ठिकाणच्या नमुन्यात ई-कोलाय जीवाणू आढळला. त्यामुळे टँकरचालक-मालक, विहिरी व इंधन विहिरी चालकांना महापालिकेने पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर करण्याचे आदेश दिले होते.

ही पावडर महापालिकेकडून मोफत दिली जाईल, असेही प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र, त्यानंतरही केवळ एका टँकरचालकाकडून ब्लिचिंग पावडर नेण्यात आली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने आता उर्वरित खासगी टँकरचालक, विहिरी, मालकांना नोटीस बजावली असून याद्वारे कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान, खासगी टँकर, आरओ प्लँटमधील पाण्याचेही नमुने तपासणीसाठी घेतले आहे. महापालिकेने आता खासगी टँकर पाणी भरणा केंद्र व खासगी पाणी शुद्धीकरण प्रकल्पातील (आरओ प्लँट) पाण्याचे नमुने घेण्यास सुरुवात केली आहे.

पाणी तपासणीसाठी सोसायट्यांनीच पालिकेकडे यावे

धायरी, नांदोशी, किरकटवाडी, नांदेड या भागांसह काही गावांमध्ये जीबीएसचे रुग्णसंख्या वाढल्यानंतर मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. दूषित पाण्यामधून हा आजार होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पाण्याची शुद्धता तपासणीसाठी महापालिकेने सोसायट्यांनाच पालिकेकडे येण्याचे आवाहन केले आहे.

जीबीएस बाधित क्षेत्रात ज्या प्रमाणे टँकर पॉईंट आहे, तेथे ब्लिचिंग पावडर उपलब्ध करून दिली आहे. शहरातील इतर भागातील टँकर पॉईंटवर तपासणी करून पुढील निर्णय घेतला जाईल. - नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, महापालिका.

Web Title: Tanker drivers taunt the Municipal Corporation; Only one took free bleaching powder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.