शहरातील टँकरच्या फेऱ्या घटल्या
By Admin | Published: August 18, 2016 06:37 AM2016-08-18T06:37:00+5:302016-08-18T06:37:00+5:30
शहराला दररोज एक वेळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्यानंतर शहरातील सोसायट्या, उपनगरांमधून येणारी टँकरची मागणी कमी झाली आहे. यामुळे पालिकेच्या नियमित होणाऱ्या
पुणे : शहराला दररोज एक वेळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्यानंतर शहरातील सोसायट्या, उपनगरांमधून येणारी टँकरची मागणी कमी झाली आहे. यामुळे पालिकेच्या नियमित होणाऱ्या टँकरच्या फेऱ्यांमध्ये घट झाली आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मागील वर्षी निम्म्यापेक्षा कमी साठा झाल्याने सप्टेंबर २०१५ पासून शहराच्या पाण्यात ३० टक्क्यांनी कपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता.
त्यामुळे अनेक सोसायट्यांच्या टाक्यांमध्ये कमी पाणी जमा होत असल्याने त्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत होते. उपनगरातील अनेक भागांमध्ये तसेच नगर रोड परिसरात अनेक ठिकाणी पाण्याचा कमी दाबाने पुरवठा होत असल्याने तेथून मोठ्या प्रमाणात टँकरची मागणी येत होती. मे महिन्यात शहराला २० हजार २५४ टँकर लागल्याची नोंद करण्यात आली होती. आॅगस्ट महिन्यामध्ये टँकरची संख्या ५ हजारांपर्यंत खाली आहे.
नगररोड परिसरामध्ये पाण्याच्या टाक्यांची संख्या अपुरी असल्याने तेथील अनेक भागांमधून
अजूनही टँकरची मागणी सुरू
आहे. त्याचबरोबर मोठ्या कंपन्या, हॉटेल यांना टँकरने पुरवठा केला जात आहे. जुलै महिन्यात १५ हजार टँकरच्या फेऱ्या करण्यात आल्या होत्या. जून महिना पूर्ण कोरडा गेला होता. जुलै महिन्यापासून धरणक्षेत्रात पावसाला सुरुवात झाली. धरणे निम्म्यापेक्षा जास्त भरल्यानंतर पाणीकपात रद्द करून दररोज एक वेळ पाणी देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
दररोज पाणीपुरवठा होऊ लागल्यामुळे सोसायट्यांच्या टाक्यांमध्ये पाण्याचा पुरेसा साठा होऊ लागला आहे. दररोज पाणीपुरवठा सुरू व्हावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, काँग्रेस यांना तीव्र आंदोलन उभे केले. त्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी कालवा समितीची बैठक बोलावून दररोज पाणीपुरवठा करण्यास संमती दिली.