थेऊर फाटा येथे ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणाऱ्या टँकरला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:19 AM2021-03-04T04:19:21+5:302021-03-04T04:19:21+5:30

याप्रकरणी श्रीकांत राजेंद्र सुंबे ( वय ३६, रा. बँक ऑफ बडोदाचे नजीक, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली) यांनी फिर्याद ...

A tanker transporting flammable material caught fire at Theur Fata | थेऊर फाटा येथे ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणाऱ्या टँकरला आग

थेऊर फाटा येथे ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणाऱ्या टँकरला आग

Next

याप्रकरणी श्रीकांत राजेंद्र सुंबे ( वय ३६, रा. बँक ऑफ बडोदाचे नजीक, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार : सुंबे यांचा ओम शिवकृपा ट्रान्सपोर्टच्या नावाने भारत पेट्रोलियम, कदमवाकवस्ती कंपनीमध्ये डिझेल व पेट्रोल ट्रान्सपोर्ट करण्याचा व्यवसाय आहे. त्यांचेकडे टॅंकर ( एमएच १२ एनएक्स ७११६ ) आहे. त्यावर संगमेश्वर मालू सुळे हा ड्रायव्हर म्हणून कामास आहे. मंगळवार ( २ मार्च ) रोजी रात्री ९ - ३० वाजण्याच्या सुमारास ड्रायव्हर संगमेश्वर सुळे याने टॅंकरमध्ये १० हजार लिटर डिझेल व ९ हजार लिटर पेट्रोल भरून तो भारत पेट्रोलियम कंपनीच्या बाहेर काढला.

टॅंकर हा महाबळेश्वर ( सातारा ) येथे खाली करावयाचा होता. परंतु रात्रीची गाडी खाली होत नसल्याने सुळे याने तो टॅंकर सुंबे यांचे घराच्या बाजूला असणाऱ्या पार्किगमध्ये रात्री ११ - १५ वाजण्याच्या सुमारास आणून लावला. सुळे टॅंकरचे खाली उतरले तेव्हा केबिनच्या पाठीमागे वायरिंमध्ये स्पार्किंग होत असल्याचे त्यांचे निदर्शनास आले. त्यानंतर टॅंकरने अचानक पेट घेतला. सुळे यांनी सदर बाब सुंबे फोन करून सांगितली. ते तेथे पोहोचले व त्यांनी तत्काळ पोलीस व अग्निशमन विभागास सदर माहिती दिली. टॅंकर मध्ये ज्वलनशील पदार्थ असल्याने आगीची तीव्रता मोठी होती. सुमारे ५ ते ७ किलोमीटर परिसरातून ही आग दिसत होती त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

आगीची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस व त्यानंतर पीएमआरडीए अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तब्बल २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. परंतु तोपर्यंत टॅंकर पूर्णपणे जळाला होता. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून टँकरच्या शेजारी उभे असलेले २ ट्रक लोणी काळभोर पोलिसांच्या मदतीने सुरक्षित बाजूला काढण्यात आले. अन्यथा या नुकसानीची तीव्रता वाढली असती व मोठा अनर्थ घडला असता. झालेल्या दुर्घटनेत कोणास काही एक दुखापत व जीवितहानी झालेली नाही. हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे - पाटील, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती आटोक्यात आणली. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर करीत आहेत.

Web Title: A tanker transporting flammable material caught fire at Theur Fata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.