वासुंदेच्या छावणीसाठी टँकर, पाणी मोफत
By Admin | Published: May 10, 2016 12:47 AM2016-05-10T00:47:03+5:302016-05-10T00:47:03+5:30
संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना पाळीव जनावरे, वन्यप्राणी व पशुपक्ष्यांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
वासुंदे : संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना पाळीव जनावरे, वन्यप्राणी व पशुपक्ष्यांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र, अशाही स्थितीत वासुंदे (ता. दौंड) येथील माजी सरपंच दत्तात्रय अर्जुन जांबले यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून गावात सुरू असलेल्या जनावरांच्या चारा छावणीला मोफत पाणी व टँकर उपलब्ध करून दिला आहे.
या ठिकाणी महिनाभरापासून जनहित रक्षक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जनावरांसाठी चाराछावणी सुरू करण्यात आली असून, तीत जवळपास ५०० लहानमोठी जनावरे दाखल आहेत. या जनावरांना चारा पुरवण्याचे काम या सेवाभावी संस्थेबरोबरच अन्य सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींकडून करण्यात येत आहे.
मात्र, या छावणीत दाखल झालेल्या जनावरांसाठी तीव्र टंचाईच्या काळातही पाणी पुरवण्याची सोय छावणी सुरू झाल्यापासून गावाचे माजी सरपंच दत्तात्रय जांबले तसेच त्यांच्या सुनबाई व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या नंदा प्रभाकर जांबले यांच्या वतीने करण्यात येत आहे. येथील जनावरांसाठी दररोज १२ ते १५ हजार लिटर पाणी पुरवण्याचे काम जांबले कुटुंबाकडून होत असल्याने त्यांच्या या दातृत्वाला येथील शेतकरी सलाम करीत आहेत.