तंत्रयुग, अवकाशयुग, अणुयुगाचा प्रवास करीत मनुष्यप्राणी ‘भ्रमयुगात’ : भारत सासणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:16 AM2021-08-18T04:16:41+5:302021-08-18T04:16:41+5:30
पुणे : ‘हतबलता’ हा काळाचा प्रवाह आहे. कोरोना महामारीमुळे झालेले सूक्ष्म बदल हे अनामिक भीतीने ग्रासलेले आहेत. महामारीचा या ...
पुणे : ‘हतबलता’ हा काळाचा प्रवाह आहे. कोरोना महामारीमुळे झालेले सूक्ष्म बदल हे अनामिक भीतीने ग्रासलेले आहेत. महामारीचा या प्रसंगाला मानवजातीला पहिल्यांदाच सामोरे जावे लागते आहे, असे नाही. शंभर वर्षांपूर्वी पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातले होते. लोक रस्त्यावर मरून पडत होती. या साथीच्या रोगावर ब्रिटिशांनी केलेल्या उपायांच्या नोंदी आठवतात; परंतु त्या नोंदीमध्ये समाजमानस शास्त्रीय नोंदी आढळत नाहीत. तंत्रयुग, अवकाशयुग, अणुयुग असा प्रवास करीत मनुष्य प्राणी आता भ्रमयुगात आलेला आहे. या युगात सर्वसामान्य मनुष्य भ्रमिष्ट झालेला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी केले.
दिलीपराज प्रकाशनतर्फे प्रकाशित आणि लेखक राजीव बर्वे लिखित ‘मनमोकळं’ या विनोदी कथा संग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक विचारवंत भारत सासणे उपस्थित होते.
प्रा. जोशी म्हणाले, विनोदी लेखन करणे ही खरं तर कसोटीच असते. मनाची निखळता असल्याशिवाय दर्जेदार विनोदी लेखन होऊच शकत नाही. समुद्र मंथनातून चौदा रत्ने बाहेर आली. परंतु विनोदाचे पंधरावे रत्न गवसायचे असल्यास संसाररूपी समुद्र मंथन करण्याशिवाय पर्याय नसतो. संसारातील सर्व कर्तव्य पार पाडत असताना येणाऱ्या सुख-दु:खाच्या प्रसंगातून अनुभव गाठीशी बांधत त्यात ही विनोद शोध बुद्धी जागृत ठेवावी लागते, तरच संसाररूपी रथ खेचून नेणे शक्य होते. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात ‘मनमोकळ’ या विनोदी कथासंग्रह पुस्तकातील दोन कथांतील काही निवडक भागाचे अभिवाचन करण्यात आले. त्यात अविनाश ओगले, सुदीप बर्वे, प्रसन्न जोगदेव आणि सुनीता ओगले यांनी सहभाग नोंदविला होता.
मधुर बर्वे यांनी सूत्रसंचालन केले, तर मधुमिता बर्वे यांनी आभार मानले.
-------------------------------------