टणू, नरसिंहपूर, गोंदी, ओझरे राहिले कोरोनापासून दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:09 AM2021-04-24T04:09:45+5:302021-04-24T04:09:45+5:30
नीरा नरसिंहपूर : नीरा नरसिंहपूर परिसरामध्ये टणू, नरसिंहपूर, गोंदी, ओझरे, तालुका इंदापूर येथील या चार गावांनी कोरोना रोगाचा ...
नीरा नरसिंहपूर : नीरा नरसिंहपूर परिसरामध्ये टणू, नरसिंहपूर, गोंदी, ओझरे, तालुका इंदापूर येथील या चार गावांनी कोरोना रोगाचा संसर्ग होऊ दिलेला नाही. या चार गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सर्व सदस्य आणि ग्रामसेवक व पदाधिकारी ग्रामस्थ यांनी अतिशय काटेकोरपणे नियोजन केले.त्यामुळे कोरोनाला वेशीवरच अडविण्यात यश आले आहे.
सर्वांनी एकमेकांना जनसंपर्क टाळला व चौकाचौकांतून होणाऱ्या बैठकाही बंद केल्या आहेत. सरकारच्या नियमांचे पालन करून वेळेत दुकाने उघडणे व बंद करून या नियमाचे पालनही करण्यात आले. प्रत्येकाने आपापल्या गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली. रोगाचा संसर्ग होऊ नये म्हणून बाहेर गावाहून येणाऱ्या ग्रामस्थांनाही पंधरा दिवस स्वत:च्या घरामध्ये होम क्वारंटाईन केले आहे. या चार गावांपैकी नीरा नरसिंहपूर व गोंदी येथील या गावांमध्येही रोगाचा शिरकाव होऊ नये म्हणून औषध फवारणी केलेली आहे .उर्वरित राहिलेल्या टणू, ओझरे गावांमध्येही फवारणी करण्यात येईल, असे टणू गावछया सरपंच राजकुमारी सागर मोहिते सांगत होत्या.
ओझरे येथील सुनील पालवे, नरसिंहपूर येथील सरपंच अश्विनी सरवदे व उपसरपंच विठ्ठल देशमुख, चंद्रकांत सरवदे, तसेच गोंदी गावचे सरपंच इंदुबाई वाघमोडे, रंजीत वाघमोडे यांनी या कोरोना रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. प्रत्येक गावांमध्ये लसीचा पहिला डोस दिलेला आहे .उर्वरित राहिलेल्या ग्रामस्थांना व नागरिकांना लसीचा डोस लवकरात लवकर मिळावी, अशी या ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे.