तन्वीर सन्मान यंदा नसीरुद्दीन शाह यांना जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 03:02 PM2019-11-29T15:02:01+5:302019-11-29T15:03:08+5:30
यंदाचा तन्वीर सन्मान पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना प्रदान करण्यात येणार आहे.
पुणे : रुपवेध प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा तन्वीर सन्मान पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना जाहीर झाला आहे. दीपा लागू यांनी पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. तर तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार यंदा पुण्यातील महाराष्ट्र कल्चरल सेंटर या संस्थेला प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक गोंविद निहलानी यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
दरवर्षी 9 डिसेंबर राेजी रुपवेध प्रतिष्ठानच्या वतीने तन्वीर तन्वीर सन्मान आणि तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार दिला जाताे. तन्वीर हा ज्येष्ठ अभिनेते डाॅ. श्रीराम लागू आणि दिपा लागू यांचा मुलगा. त्याचे एका अपघातात निधन झाले. त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ हा साेहळा आयाेजित केला जाताे. भारतीय रंगभूमिच्या प्रवागात अतिशय महत्त्वपूर्ण, भरीवकामगिरी केलेल्या रंगधर्मींना तन्वीर पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. आजची रंगभूमी ज्यांच्या खांद्यावर उभी आहे त्यांचा परिचय आजच्या पिढीला व्हावा असा ही एक उद्देश आहे.
नसीरुद्दीन शाह यांच्या नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील याेगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. शाह नेहमीच चित्रपटांसाेबत रंगभूमिवर कार्यरत राहिले आहेत. इंग्रजी तसंच हिंदी, उर्दू भाषेतल्या त्यांच्या नाटकांनी रंगभूमीवर प्रत्येकवेळी नवा आणि कालसुसंगत आशय मांडला आहे.